तुळजाभवानी देवीच्या तलवारीवरून पुजारी, मंदिर संस्थानमध्ये वादंग अन् वादावर पडदा; जीर्णोद्धार कामात गायब झाल्याचा केला होता दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 13:06 IST2025-08-03T13:06:10+5:302025-08-03T13:06:33+5:30
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सध्या सिंह गाभाऱ्यासह मंदिर परिसरात ५८ कोटी रुपये खर्चून दुरुस्ती आणि विकासकामे सुरू केली आहे. जीर्णोद्धाराच्या या कामांपूर्वी विधीवत पूजा करण्यात आली होती. त्यात देवीच्या तलवारीचीही पूजा केली होती.

तुळजाभवानी देवीच्या तलवारीवरून पुजारी, मंदिर संस्थानमध्ये वादंग अन् वादावर पडदा; जीर्णोद्धार कामात गायब झाल्याचा केला होता दावा
धाराशिव : श्री तुळजाभवानी देवीची तलवार जीर्णोद्धार कामाच्या वेळी गायब झाली असून, ती बाहेर अन्यत्र कोठेतरी ठेवल्याचा दावा करीत शनिवारी पुजारी मंडळाने एकच खळबळ उडवून दिली. ही तलवार नित्यपूजेसाठी मूर्तीसमोर ठेवण्याची मागणी मंडळाने केलेली आहे. दरम्यान, मंदिर संस्थानने यावर दुपारी स्पष्टीकरण देत तलवार मठात असून, ती कोठेही गायब झाली नसल्याचे सांगत निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सध्या सिंह गाभाऱ्यासह मंदिर परिसरात ५८ कोटी रुपये खर्चून दुरुस्ती आणि विकासकामे सुरू केली आहे. जीर्णोद्धाराच्या या कामांपूर्वी विधीवत पूजा करण्यात आली होती. त्यात देवीच्या तलवारीचीही पूजा केली होती.
तलवार नित्यपूजेसाठी वाकोजीबुवा मठामध्ये
मात्र, यानंतर ही तलवार गायब झाली. मंदिर संस्थानकडे लेखी विचारणा केल्यानंतरही त्यांच्याकडून उत्तर न मिळाल्याने ती गायब झाल्याचा संशय व्यक्त करीत पुजारी मंडळाने शनिवारी थेट मंदिर संस्थानवर निशाणा साधला.
दरम्यान, लागलीच दुपारी मंदिर संस्थानने यावर स्पष्टीकरण देत, तलवार गायब झाली नसल्याचे सांगितले. ती धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची असल्याने वाकोजीबुवा मठात नित्यपूजेसाठी ठेवण्यात आल्याचे स्पष्ट केले.