निधीअभावी रेल्वे मार्गाचे काम बंद पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:55+5:302021-07-17T04:25:55+5:30

उस्मानाबाद : सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी आर्थिक वर्ष सन २०२१-२२ मध्ये केंद्र सरकारने २२ कोटी रुपयांची तरतूद केली. परंतु, राज्य सरकारने ...

Possibility of closure of railway line due to lack of funds | निधीअभावी रेल्वे मार्गाचे काम बंद पडण्याची शक्यता

निधीअभावी रेल्वे मार्गाचे काम बंद पडण्याची शक्यता

उस्मानाबाद : सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी आर्थिक वर्ष सन २०२१-२२ मध्ये केंद्र सरकारने २२ कोटी रुपयांची तरतूद केली. परंतु, राज्य सरकारने समप्रमाणात हिस्सा जमा न केल्यास या प्रकल्पाचे काम बंद पडू शकते. यासाठी राज्य आकस्मिक निधीमधून तातडीने २२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधितांची व्हर्च्युअल बैठक बोलवावी, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेमार्गाने जोडावे, ही देशभरातील भाविकांसह या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर या भागाच्या आर्थिक विकासाला आणखीन चालना मिळणार आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा ८४.४४ कि.मी. लांबीचा व ९०४.९२ कोटी रुपये किमतीचा रेल्वे मार्ग मंजूर करून सन २०१९ मध्ये या कामाचे भूमिपूजन केले. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रकल्पाप्रमाणे खर्चाचा ५० टक्के हिस्सा उचलण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१९ मध्ये मान्य केले होते व या अनुषंगाने तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना कळविले होते. तसेच तत्कालीन प्रधान सचिव गृह (परिवहन व बंदरे) यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य मुकेश कुमार गुप्ता यांना याबाबतची राज्य सरकारची अधिकृत सहमती कळविली होती.

केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये या प्रकल्पासाठी २२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच प्रकल्पाचे काम सुरळीतपणे सुरू राहावे यासाठी सम प्रमाणातील राज्याच्या हिस्याच्या रकमेची तरतूद करण्याबाबत रेल्वे विभागाचे मुख्य अभियंता (बांधकाम) यांनी प्रधान सचिव गृह (परिवहन व बंदरे) यांच्याकडे मागणी केली आहे. या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षण व भूसंपादनाच्या कामाला सुरुवातदेखील झालेली आहे. परंतु, परिवहन मंत्री अनिल परब यांनी ‘सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग संपूर्णतः केंद्र शासनाच्या आर्थिक सहभागाने होणार असल्याने राज्य शासनाने निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’ असे विधान याबाबतच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेमध्ये केले होते. राज्याने ५० टक्के हिस्सा देण्याचे मान्य केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरदेखील या रेल्वेमार्गासाठी राज्याचा हिस्सा देण्याबाबत त्यांची नकारात्मकता दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू होऊन वेळेत पूर्ण व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्य आकस्मिक निधीमधून तातडीने २२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधितांची व्हर्च्युअल बैठक घ्यावी, अशी मागणी आ. पाटील यांनी केली आहे.

Web Title: Possibility of closure of railway line due to lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.