'ते' नमुने कॅल्शिअम क्लाेराईडचे निघाले, आता पाेलिसांना ‘परंडा ड्रग्ज केस’चा करायचा पुन्हा तपास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 19:49 IST2025-04-30T19:48:06+5:302025-04-30T19:49:17+5:30

अधिक तपासासाठी परवानगी : गुन्ह्यातील कागदपत्रे मिळविण्यासाठी न्यायालयास विनंती

Police should reinvestigate the 'Paranda drugs case'! | 'ते' नमुने कॅल्शिअम क्लाेराईडचे निघाले, आता पाेलिसांना ‘परंडा ड्रग्ज केस’चा करायचा पुन्हा तपास!

'ते' नमुने कॅल्शिअम क्लाेराईडचे निघाले, आता पाेलिसांना ‘परंडा ड्रग्ज केस’चा करायचा पुन्हा तपास!

धाराशिव : जानेवारी २०२४ मध्ये परंडा पाेलिस ठाण्यात ‘एनडीपीएस ॲक्ट’अंतर्गत गुन्हा दाखल झाला हाेता. पकडलेल्या ड्रग्जचे नमुने छत्रपती संभाजीनगर येथील प्रयाेगशाळेत पाठविले हाेते. अहवालाअंती ते ड्रग्ज नव्हे तर कॅल्शिअम क्लाेराईड असल्याचे समाेर आले हाेते. यानंतर पाेलिसांनी हा गुन्हा रद्द करावा, अशी भूमिका घेत काेर्टात ‘क’ समरी अहवाल दाखल केला हाेता. दरम्यान, पाेलिसांच्या याच भूमिकेवर माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रश्नचिन्ह लावले हाेते. या प्रकरणाचा सखाेल तपास व्हावा, अशी मागणी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे केली हाेती. यानंतर यंत्रणा हलली. आता परंडा ड्रग्ज केसचा पुन्हा तपास करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. साेबतच गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे मिळावित, यासाठी विनंतीही केली आहे. याअनुषंगाने आता ३ मे राेजी सुनावणी हाेणार आहे.

परंडा पाेलिस ठाण्यात १९ जानेवारी २०२४ राेजी गुरनं १०/२०२४ कलम ८ (क), २० (ब) एनडीपीएस ॲक्टनुसार सपाेनि मुसळे यांनी गुन्हा दाखल केला हाेता. या प्रकरणाचा तपास पाेनि विनाेद इज्जपवार यांनी केला हाेता. गुन्ह्यात जप्त केले ड्रग्ज सॅम्पल छत्रपती संभाजीनगर येथील प्रयाेगशाळेत तपासणीसाठी २९ फेब्रुवारी २०२४ राेजी पाठविले हाेते. ड्रग्ज नमुने तपासणी अहवाल डिसेंबर २०२४ मध्ये आला. अहवालाअंती ते ड्रग्ज नव्हे तर कॅल्शिअम क्लाेराईड असल्याचे समाेर आले हाेते. कॅल्शिअम क्लाेराईड हे मेंदूवर परिणाम करून गुंगी वा नशा येणारे नसल्याचे सांगत अटकेतील दाेन्ही आराेपींविरुद्ध या गुन्ह्यात दाेषाराेपपत्र दाखल करण्यासाठी पुरावा नाही. फिर्यादीने गैरसमजुीने फिर्याद दिलेली असल्याचे तपासातून समाेर येत असल्याचे नमूद करीत संबंधित गुन्ह्यात ‘क’ समरी अहवाल दाखल केला हाेता. 

बार्शी पाेलिसांनी ड्रग्ज तस्कर पकडल्यानंतर त्याचे धागेदाेरे परंड्यात पाेहाेचले. यानंतर माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत थेट पाेलिस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले हाेते. यानंतर थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घालून प्रकरणाची सखाेल चाैकशी व्हावी, अशी मागणी केली हाेती. आता पाेलिसांनीही या गुन्ह्याचा पुन्हा तपास करण्याची भूमिका घेतली आहे. तपासाअंती अधिकचे पुरावे मिळू शकतात, अशी शक्यता व्यक्त करीत न्यायालयाकडे गुन्ह्याचा पुन्हा तपास करण्याची परवानगी मागितली आहे. एवढेच नाही तर गुन्ह्यातील कागदपत्रेही मिळावित, अशी विनंतीही केली आहे. याअनुषंगाने आता ३ मे राेजी सुनावणी हाेणार आहे.

दाेघांना केली हाेती अटक...
परंडा पाेलिसांनी १९ जानेवारी २०२४ राेजी ड्रग्ज विक्री प्रकरणात दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल केला हाेता. यांच्याकडून ८.३३ ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले. यापैकी एकाने ड्रग्ज सेवनासाठी घेतल्याचे पाेलिसांकडे कबूल केले हाेते. असे असतानाही पाेलिसांनी ‘क’ समरी अहवाल सादर केलाच कसा, असा सवाल माजी आमदार ठाकूर यांनी केला हाेता.

Web Title: Police should reinvestigate the 'Paranda drugs case'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.