आठवडी बाजारातून मोबाइलची पळविला
वाशी : येथील आठवडी बाजारातून बाजारकरूचा मोबाइल चोरीस गेल्याची घटना १० जानेवारी रोजी घडली. येथील बाळकृष्ण साहेबराव कुदळे हे १० जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आठवडी बाजारात गेले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन त्यांचा मोबाइल चोरून नेला. या प्रकरणी कुदळे यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादातून एकास मारहाण
तुळजापूर : जुन्या भांडणावरून एकास मारहाण झाल्याची घटना शहरातील दीपक चौक भागात १० जानेवारी रोजी घडली. येथील करीम आजम शहा मुर्शद हे १० जानेवारी रोजी दीपक चौकात असताना गल्लीतीलच अमीर कादर शेख, अल्ताफ शेख, अरबाज शेख यांनी मुर्शद यांना पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकरणी मुर्शद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंधन दरवाढीचा रायुकाँकडून निषेध
कळंब : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून सातत्याने होत असलेल्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी रायुकाँचे प्रदेश सरचिटणीस तारेख मिर्झा, वक्ता प्रशिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे, रायुकाँ प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंतनू खंदारे, ॲड.मंगेश आष्टेकर, दिनेश यादव, अंगद बारगुले, भीमा हगारे, मोहसीन मिर्झा, अजय जाधव, नितीन वाडे आदी उपस्थित होते.
साडी-चोळी देऊन महिलांचा सन्मान
उमरगा :तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिजाऊ दशरात्रौत्सवानिमित्त सोमवारी गुंजोटी येथील सफाई कामगार महिलांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आल्या. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा प्रवक्ता रेखाताई सूर्यवंशी, तालुकाध्यक्षा रेखाताई पवार, कल्पना कांबळे, विजयाताई चव्हाण आदींची उपस्थिती होती. प्रारंभी रेखाताई पवार यांनी जिजाऊ वंदना घेतली. प्रास्ताविक पवार यांनी केले.
पथसंचलन
परंडा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील देवगाव (खु) येथे पोनि सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथसंचलन झाले. यावेळी गावात सार्वजनिक शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.