पोलीस पाटील तुम्हीही! कारवाईची धमकी देत वाळू ठेकेदाराकडून घेतली ७० हजारांची लाच
By चेतनकुमार धनुरे | Updated: March 24, 2023 18:39 IST2023-03-24T18:38:23+5:302023-03-24T18:39:09+5:30
नियमबाह्यपणे वाळू उत्खनन सुरु असल्याचे सांगत मागितले होते २ लाख रुपये

पोलीस पाटील तुम्हीही! कारवाईची धमकी देत वाळू ठेकेदाराकडून घेतली ७० हजारांची लाच
धाराशिव : वाळू उत्खननाचा ठेका मिळालेल्या एका तरुण ठेकेदारास कारवाईची धमकी देत ढगपिंपरी येथील पोलीस पाटलाने थेट दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. यापैकी ७० हजार रुपये स्विकारताना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या पोलीस पाटलास रंगेहात ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी परंडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एका २६ वर्षीय तरुणाला परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथील चांदणी नदीपात्रातील वाळू उत्खननाचा ठेका महसूल विभागाच्या लिलावातून मिळाला होता. या वाळू घाटावर नियमबाह्य उत्खनन होऊ नये, याच्या देखरेखीसाठी ग्राम दक्षता समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे सदस्य असलेले पोलीस पाटील हरिदास लिंबाजी हावळे (५१) यांनी ठेकेदारास नियमबाह्यपणे वाळू उत्खनन सुरु असल्याचे सांगून ते चालू ठेवायचे असल्यास २ लाख रुपये दे, अशी मागणी केली आहे. तडजोडीने ९ मार्च रोजी ७० हजार रुपये घेण्यास मान्यता दर्शविली.
दरम्यान, या ठेकेदाराने पोलीस पाटलाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. उपाधीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांनी तक्रारीची खातरजमा करुन २४ मार्च रोजी ढगपिंपरी येथे पथकामार्फत सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ७० हजार रुपयांची लाच घेताना हावळे यांना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.