गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने मागितली ५ लाखांची लाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:18 IST2025-07-03T17:18:07+5:302025-07-03T17:18:19+5:30
धाराशिव शहर ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आरोपींची नावे कमी करण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याने मागितली ५ लाखांची लाच
धाराशिव : गुन्ह्यातून दोघांची नावे कमी करण्यासाठी ५ लाखांची लाच मागितल्याचा प्रकार धाराशिवमध्ये उघडकीस आला आहे. शहर ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यास याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री त्यास ताब्यात घेतले.
धाराशिव शहर ठाण्यात नेमणूक असलेल्या मोबीन नवाज शेख या पोलिस कर्मचाऱ्याने एका दाखल गुन्ह्यातील आरोपींची नावे कमी करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांचे वडील व भाऊ यात आरोपी करण्यात आले आहेत. त्यांची नावे गुन्ह्यातून कमी करण्यासाठी मोबीन याने चक्क ५ लाख रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. तडजोडीअंती ४ लाख रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवली.
याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांनी या प्रकाराची खात्री केल्यानंतर मंगळवारी रात्री पथकामार्फत सापळा रचला व आरोपी पोलिस कर्मचारी मोबीन शेख यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक बुलेट, ८६७० रुपये व मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच एक पथक घर झडतीसाठी रवाना केल्याचे वेळापुरे यांनी सांगितले.