नगरसेवकाने नगराध्यक्षांच्या दालनातील दूरध्वनी फोडला; उस्मानाबादमध्ये सर्वसाधारण सभेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:40 IST2018-09-10T18:36:03+5:302018-09-10T18:40:25+5:30
भारत बंद असल्याने आजची सभा उद्या घ्यावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली होती़

नगरसेवकाने नगराध्यक्षांच्या दालनातील दूरध्वनी फोडला; उस्मानाबादमध्ये सर्वसाधारण सभेतील प्रकार
उस्मानाबाद : येथील नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे व्हिडीओ छायाचित्रकीरण करावे, महागाईमुळे भारत बंद असल्याने आजची सभा उद्या घ्यावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली होती़ या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने नगराध्यक्षांच्या दालनातील दूरध्वनीची तोडफोड केली़
नगर पालिकेच्या सभागृहात सोमवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते़ वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी भारत बंद होता़ त्यामुळे सभा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आजची सभा तहकूब करून उद्या घ्यावी, अशी मागणी लावून धरली़ या विषयावरून गोंधळास सुरूवात झाली़ सभागृहात हा विषय मान्य होत नसल्याने नगराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे जनतेत सर्वसाधारण सभा घ्यावी किंवा सभा ‘इनकॅमेरा’ घ्यावी, अशी मागणी लावून धरली.
या दोन विषयावर तब्बल दीड ते दोन तास गोंधळ सुरू होता़ सत्ताधारी विरोधी सदस्य एकमेकांविरूध्द आक्रमक झाले होते़ मागणी मान्य होत नसल्याने संतापलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक माणिक बनसोडे यांनी नगराध्यक्षांच्या टेबलावरील दूरध्वनी उचलून आदळला़ यानंतर सभागृहातील वातावरण काही काळ तणावाचे झाले होते़ या घटनेनंतर एकाही विषयावर साधक-बाधक चर्चा न झाल्याने सर्व विषय नामंजूर करीत नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सभा संपल्याचे जाहीर केले़
कारवाई होणार
सर्वसाधारण सभा सुरू असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक माणिक बनसोडे यांनी सभागृहातील टेलीफोनची तोडफोड करीत अधिकाºयांशी अरेरावी केली आहे़ या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली़