गतवर्षीची पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST2021-08-20T04:37:21+5:302021-08-20T04:37:21+5:30
कळंब : विमा कंपन्या आणि सरकारची मिलिभगत असल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नसल्याचा आरोप करून हा प्रकार थांबवून मागील वर्षीचा ...

गतवर्षीची पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना द्या
कळंब : विमा कंपन्या आणि सरकारची मिलिभगत असल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नसल्याचा आरोप करून हा प्रकार थांबवून मागील वर्षीचा नुकसानीचा त्वरित पीकविमा द्यावा. तसेच यावर्षी हेक्टरी २५ हजार रुपये शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्याची मागणी कळंब तालुका वंचित बहुजन आघाडीने राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पीकविमा कंपनी व सरकारने शेतकऱ्यांकडून विम्याचे हप्ते भरून घेतले. मात्र, पिकांच्या नुकसानीची भरपाई देताना ७२ तासांची अट घातली आहे. शेतकरी आधीच नुकसानीने त्रस्त असताना अशा अटी लादून शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित रहावे लागत आहे. २०१९ व २०२० मध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानही झाले. मात्र, अटीचे कारण देऊन शेतकऱ्यांना विमा दिला नाही. हा प्रकार टाळूवरचे लोणी खाण्यासारखा असल्याचे वंचितने या निवेदनात म्हटले आहे.
यंदाही जवळपास पावसाने १ महिन्याचा खंड दिल्याने ८० टक्के पिके वाळून गेली आहेत. २० टक्के पिकांचा उताराही कमी येणार आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची तसेच मागील पीकविमा मंजूर करून तोही देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्याची मागणी वंचितने या निवेदनात केली आहे. या निवेदनावर वंचितचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ मळगे, जिल्हा निरीक्षक प्रा अरविंद खांडके, अरुण गरड, इंद्रजित गायकवाड, रसूल खान, कुंदन कांबळे, नितीन कांबळे, सचिन गवळी, परमेश्वर कसबे, प्रवीण ताकपिरे आदींच्या सह्या आहेत.