गेम खेळण्यासाठी पालकांनी मोबाइल दिला नाही, १६ वर्षीय मुलीने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:13 IST2025-07-04T14:12:12+5:302025-07-04T14:13:59+5:30
गेमसाठी मोबाइल न भेटल्याने नाराज झालेल्या मुलीने घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास घेतला.

गेम खेळण्यासाठी पालकांनी मोबाइल दिला नाही, १६ वर्षीय मुलीने संपवले जीवन
कळंब (जि. धाराशिव) : गेम खेळण्यासाठी पालकांनी मोबाइल देण्यास नकार दिल्याने एका सोळा वर्षीय मुलीने रागाच्या भरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री डिकसळ येथे घडली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री कळंब ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
मूळचे छत्तीसगड राज्यातील रहिवासी असलेल्या कुटुंबामध्ये ही घटना घडली आहे. कळंब शहराशेजारी डिकसळ गावाच्या हद्दीत चालू असलेल्या एका बांधकामावर निषाद कुटुंबीय मजूर म्हणून काम करीत होते. सोमवारी संध्याकाळी निषाद दाम्पत्य कामावरून घरी परतल्यानंतर त्यांची १६ वर्षीय मुलगी जागेश्वरी हिने गेम खेळण्यासाठी त्यांच्याकडे मोबाइल मागितला. मात्र, वडिलांनी गेमसाठी मोबाइल देण्यास नकार दिला. यामुळे नाराज झालेल्या जाेगेश्वरीने रात्री घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन छताच्या हुकाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला.
काही वेळानंतर कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आली असता, त्यांनी तात्काळ तिचा फास काढून दवाखान्यात नेले; पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याबाबत पालकांनी बुधवारी रात्री दिलेल्या माहितीनुसार कळंब पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.