विम्यासाठी शक्कल, ३२ लाखांच्या पेंटसह ट्रक मालकानेच पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 06:25 PM2021-12-15T18:25:20+5:302021-12-15T18:25:52+5:30

जळकोट येथे थांबविलेला ट्रक रात्रीतूनच गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने पोलिसात धाव घेतली होती

The owner stole the truck along with Rs 32 lakh worth of paint for insurance | विम्यासाठी शक्कल, ३२ लाखांच्या पेंटसह ट्रक मालकानेच पळविला

विम्यासाठी शक्कल, ३२ लाखांच्या पेंटसह ट्रक मालकानेच पळविला

googlenewsNext

उस्मानाबाद : विमा मिळविण्यासाठी चक्क स्वत:चाच ट्रक चोरुन नेण्याचा मार्ग दाखविणाच्या प्रकाराची गुन्हे शाखेने पोलखोल केली आहे. सुतावरुन स्वर्ग गाठत गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकमधील ३२ लाखांचे पेंट व ट्रक जप्त करुन आरोपी मालकाला बुधवारी बेड्या ठोकल्या.

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील अशोक सुभाष चव्हाण याच्या मालकीचा केए ५६-४१३६ क्रमांकाचा ट्रक हा सातारा येथून एका नामांकित कंपनीचा तब्बल ३२ लाखांचा पेंट घेऊन उडिशाकडे निघाला होता. दरम्यान, चालक गोविंद राठोड यांनी हा ट्रक ६ डिसेंबर रोजी रात्री जळकोट येथे थांबविला होता. रात्रीतूनच हा ट्रक गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने दिलेल्या तक्रारीवरुन नळदुर्ग ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, चोरीस गेलेला हा ट्रक नांदेड येथे विक्रीसाठी गेल्याची टीप गुन्हे शाखेला मिळताच पोलीस अधीक्षक नीवा जैन, अपर अधीक्षक नवनीत कांवत यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन घाडगे यांनी तातडीने तपासासाठी पथकाला मार्गस्थ केले. सहायक निरीक्षक मनोज निलंगेकर, शैलेश पवार यांच्यास कर्मचारी काझी, शेळके, चव्हाण, ढगारे, सर्जे, ठाकूर, आरसेवाड, कवडे, अरब व उंबरे हे ट्रकचोर राजू कन्नम्मा राठोड याच्या मागावर निघाले. तो सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथून त्यास ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नांदेड येथून चोरीस गेलेला ट्रक तर ट्रकमधील ३२ लाखांचे पेंट कल्याण येथील एका गोडाऊनमधून ताब्यात घेतले. पाठोपाठ या गुन्ह्याचा मास्टरमाईंड ट्रकमालक अशोक चव्हाण यासही ताब्यात घेण्यात आले आहे.

निम्म्या किंमतीत विकणार होते पेंट...
ट्रक चोरीस गेल्याचे दर्शवून त्यावरील विम्याची रक्कम मिळविण्याची शक्कल ट्रकमालक अशोक चव्हाण याची होती. त्यानेच ट्रकचोरास वाहन दाखवून दिले होते. पुढे ट्रकमधील ३२ लाखांचे पेंट इतर दोन साथीदारांच्या मदतीने अन्य वाहनाने कल्याणला रवाना केले. त्या भागात निम्म्या किंमतीत हा माल विक्री करुन १६ लाख मिळवायचे. शिवाय, ट्रकचा विमाही घश्यात घालायचा त्याचा डाव होता. तो गुन्हे शाखेने हाणून पाडत अशोक चव्हाणला बेड्या ठोकल्या. सध्या तो व ट्रकचोर कोठडीची हवा खात आहेत.

Web Title: The owner stole the truck along with Rs 32 lakh worth of paint for insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.