काेट्यवधी रुपयांचा गंडा, ऑनलाईन जुगार रॅकेटचा पर्दाफाश; धाराशिव, बीड, नांदेडमधील आराेपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 15:30 IST2025-07-17T15:22:52+5:302025-07-17T15:30:02+5:30

तपासात धाराशिवसह बीड, नांदेडमधील पाच आराेपी निष्पन्न झाले आहेत.

Online gambling racket busted! Five accused from Beed, Nanded including Dharashiv arrested | काेट्यवधी रुपयांचा गंडा, ऑनलाईन जुगार रॅकेटचा पर्दाफाश; धाराशिव, बीड, नांदेडमधील आराेपी

काेट्यवधी रुपयांचा गंडा, ऑनलाईन जुगार रॅकेटचा पर्दाफाश; धाराशिव, बीड, नांदेडमधील आराेपी

धाराशिव : शासनाने प्रतिबंधित केलेल्या ऑनलाईन गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या ऑनलाईन जुगाराच्या मोठ्या रॅकेटचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. तपासात धाराशिवसह बीड, नांदेडमधील पाच आराेपी निष्पन्न झाले आहेत. यांनी लाेकांना काेट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा पाेलिसांना संशय आहे.

बीड जिल्ह्यातील तिघे, नांदेड व धाराशिवमधील प्रत्येकी एक असे पाचजण शासनाने प्रतिबंधित केलेल्या बीडीजी ऑनलाईन गेम, दमन ऑनलाईन गेम आणि टी. सी. ऑनलाईन गेम यासारख्या जुगाराच्या लिंक्स व्हॉट्सॲपद्वारे लोकांपर्यंत पाेहाेचवित हाेते. कमी पैशांत जास्त परतावा मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून लोकांना या गेममध्ये पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त करत होते. एकदा पैसे गुंतवले की, आरोपी गेममध्ये फेरफार करून किंवा पैसे घेऊन पसार होत होते, ज्यामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला. १ जानेवारी ते १५ जुलै २०२५ पर्यंत हा फसवणुकीचा गोरखधंदा सुरू होता. दरम्यान, हा प्रकार समाेर आल्यानंतर सायबर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक सुरेश कासुळे यांनी मंगळवारी फिर्याद दिली. त्यावरून पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सायबर पोलिस करत असून, नागरिकांनी अशा ऑनलाईन आमिषांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यातील साेनेसांगवी येथील उत्तरेश्वर दामोदर इटकर, केज तालुक्यातील सातेफळ येथील सुरज घाडगे, अंबाजाेगाई येथील नामदेव कांबळे, नांदेड येथील एम.डी. पाटील, तर कळंब तालुक्यातील शेळका धानाेरा येथील अस्लम दस्तगीर तांबाेळी या पाच आराेपींनी संगनमताने लोकांना आर्थिक गंडा घातल्याचा आरोप आहे. या सर्वांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नाेंद झाला आहे.

Web Title: Online gambling racket busted! Five accused from Beed, Nanded including Dharashiv arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.