वाशीमध्ये कार-ट्रक अपघातात एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 17:32 IST2018-10-01T17:32:18+5:302018-10-01T17:32:44+5:30
कार व ट्रकची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वाशीमध्ये कार-ट्रक अपघातात एकाचा मृत्यू
वाशी (जि. उस्मानाबाद) : कार व ट्रकची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील वाशी फाट्यानजीक घडली.
वाशी तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील वाशी फाट्यानजीक पोलीस टेकडीजवळ सोमवारी सकाळी बीडकडे जाणारा ट्रक (क्र. जीजे २५/ टी ९०९२) व उस्मानाबादकडे जाणारी कार (क्रमांक एमएच ०४/ डीजे ४५६३) ची समोरासमोर जोराची टक्कर झाली. यावेळी कारच्या धडकेने ट्रकचे समोरील व पाठीमागील टायरही निखळले. शिवाय, कारही चक्काचूर झाली. या अपघातामध्ये कारमधील सूरज संजय तुपशेट्टी (वय २१) व किशोर किरण घुले हे गंभीर जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान सूरज तुपशेट्टी याचे निधन झाले. दरम्यान, या कारमध्ये एक अनोळखी मुलगी होती. तीही किरकोळ जखमी झालेली आहे.
घटना घडल्यानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दोन्ही बाजुंनी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिश चव्हाण यांनी घटनास्थळाकडे धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. सूरज तुपशेट्टी हा येथील पंचायत समितीतील जीपचालक संजय तुपशेट्टी यांचा मुलगा आहे. अपघातग्रस्त कारही वाशी येथील घुले यांनी नुकतीच खरेदी केलेली आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार भाऊसाहेब बोबडे करत आहेत.