उस्मानाबादमध्ये ५०० डाक कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालय ओस, कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 21:07 IST2019-01-08T21:06:06+5:302019-01-08T21:07:05+5:30
टपाल कार्यालयांतर्गत बचत गट, बँकींगसह इतर कोट्यवधीचे व्यवहारही ठप्प झाले

उस्मानाबादमध्ये ५०० डाक कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालय ओस, कामे ठप्प
उस्मानाबाद : ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांना श्री कमलेश चंद्र कमिटीचा अहवाल लागू करावा, यासह इतर विविध मागण्यांसाठी डाक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय संप पुकारला आहे़ पहिल्याच दिवशी मंगळवारी या संपात ५०० वर कर्मचारी सहभागी झाल्याने डाक कार्यालये ओस पडली असून, कामेही ठप्प झाली होती़
टपाल कर्मचाऱ्यांच्या अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटना, एऩयू़पी़ई संघटनांनी एकत्रितपणे हा संप पुकारला आहे़ नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी, किमान वेतन व फिटमेंट फॉर्म्युला पुर्नगठित करावा, खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, सीजीएसएसमध्ये कॅशलेश ट्रीटमेंट द्यावी, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, सर्व विभागातील रिक्तपदे भरावीत अशा विविध मागण्यांसाठी ८ व ९ जानेवारी रोजी संप पुकारण्यात आला आहे़
या संपामध्ये उस्मानाबाद येथील मुख्य कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते़ त्यामुळे कार्यालय मंगळवारी दिवसभर ओस पडले होते़ मुख्य कार्यालयासह जिल्ह्यातील २९ उपडाकघर, २८८ ग्रामीण टपाल कार्यालयातील ५०० कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत़ उस्मानाबाद येथील आंदोलनावेळी संघटनेचे सचिव एम़ पी़ वाघमोडे, बी़ बी़ सोलवट, बी़ जी़ कदम, एल़एम़ मिसाळ, ए़ आऱ शेख, पी़ डी़ मते, बी़ पी़ बुबणे यांच्यासह कृती समितीच्या पदाधिकारी, सदस्यांची उपस्थिती होती़
आर्थिक व्यवहार बंद
टपाल कार्यालयांतर्गत बचत गट, बँकींगसह इतर कोट्यवधीचे व्यवहारही ठप्प झाले होते़ शिवाय टपाल वाटप ठप्प झाले होते़ कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनाही रिकाम्या हाती परतावे लागत होते़