तीन महिन्यांपासून कृषी सहाय्यक नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:30 IST2021-04-12T04:30:00+5:302021-04-12T04:30:00+5:30

कळंब : तालुक्याच्या शेती क्षेत्राच्या विकासासाठी नियुक्त केलेले कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक व मंडळ अधिकारी यांना आपल्या कार्यक्षेत्रातील गावात जाण्याचे ...

No agricultural assistant for three months! | तीन महिन्यांपासून कृषी सहाय्यक नाही !

तीन महिन्यांपासून कृषी सहाय्यक नाही !

कळंब : तालुक्याच्या शेती क्षेत्राच्या विकासासाठी नियुक्त केलेले कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक व मंडळ अधिकारी यांना आपल्या कार्यक्षेत्रातील गावात जाण्याचे वावडे निर्माण झाले आहे. यातूनच चक्क तीन महिन्यांपासून गावात कृषी सहाय्यक नसल्याची गंभीर तक्रार तालुक्यातील वाठवडा येथील ग्रामपंचायतने केली आहे.

जवळपास बाराशे हेक्टर लागवडीखालील क्षेत्र असलेल्या व प्रयोगशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून वाठवड्याची ओळख आहे. येथील नियमित कृषी सहाय्यक रजेवर गेल्यानंतर येथील अतिरिक्त पदभार दुसऱ्याकडे सोपवण्यात आला होता. यानंतरही सुधारणा झालेली नसल्याने खुद्द ग्रामपंचायतीने मागच्या तीन महिन्यापासून कृषी सहाय्यक नाहीत. ज्यांच्याकडे पदभार सोपवला आहे त्या पण कधी आलेल्या नाहीत, अशी तक्रार तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावर सरपंच सुधाकर टेकाळे यांची स्वाक्षरी आहे.

वाठवडा गाव शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्यात गावाची निवड झाल्यानंतर प्रयोगशील शेतकऱ्यांच्या या गावात मोठा आनंद व्यक्त केला जात होता. यातून २७८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यातून विविध लाभासाठी ८०८ अर्ज दाखल केले होते. त्यात २६० शेतकऱ्यांना पूर्व संमती मिळाल्या. परंतु, कृषी सहाय्यकच नसल्याने यातील अनेक शेतकऱ्यांची रेखांकन, अंदाजपत्रक, देयकांची कामे रखडली असल्याचे आकाश पवार यांनी सांगितले.

कोणी लक्ष देणारं आहे का?

कृषी खात्यात गावपातळीवरची बहुतांश कामे फिल्डवरील असतात. यासाठी ‘फिल्ड’ वरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असते. मात्र, वरिष्ठांचा धाक नसल्याने व स्थानिकांना सहन करायची सवय असल्याने हे कर्मचारी नियुक्त गावात आपल्या सोयीनुसार ‘व्हिजिट’ करत आहेत. तालुक्यातील अनेक गावात ‘सहाय्यक ते मंडळ’ असाच कारभार सुरू आहे. आपल्या गावाला नेमकं कोण नियुक्त आहे, याचाही ताळमेळ लागत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: No agricultural assistant for three months!