Killari Earthquake : एकटा असायचो तेव्हा मी रडायचो - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 14:59 IST2018-09-30T14:54:53+5:302018-09-30T14:59:59+5:30
लातूर-उस्मानाबादला भूकंप झाला तेव्हा या भागातील बाधितांना मदतीसोबतच धीर देत फिरत होतो.

Killari Earthquake : एकटा असायचो तेव्हा मी रडायचो - शरद पवार
उस्मानाबाद - लातूर-उस्मानाबादला भूकंप झाला तेव्हा या भागातील बाधितांना मदतीसोबतच धीर देत फिरत होतो. त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्याचे काम करीत होतो. पण जेव्हा एकांतात जायचो, तेव्हा मन सुन्न करणारी स्थिती डोळ्यासमोर तरळायची अन् पाणी आपसूकच गळायचे, असे भावोद्गार शरद पवार यांनी बलसुर (जि. उस्मानाबाद) येथे काढले.
भूकंपाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त बलसुर ग्रामस्थांनी त्यावेळी मदतीसाठी आधी धावून आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा रविवारी आयोजित केला होता. यावेळी पवारांनी त्यावेळच्या परिस्थितीला, आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, त्या दिवशी राज्यातील विसर्जन मिरवणुकीचा आढावा घेत कार्यालयात बसलो होतो. अडीच वाजेपर्यंत बहुतेक जिल्ह्यातील मिरवणूक पार पडल्या होत्या. परभणीत थोडी गडबड सुरू होती. ती मिटल्याचा निरोप मिळाल्यानंतर 3.30 वाजण्याच्या सुमारास झोपण्यासाठी निघालो तोच खिडक्या जोरात वाजल्या. भूकंपाची जाणीव झाली. तेव्हा कोयनेवर भूकंप मापन यंत्रणा होती. तेथे फोन केल्यावर कळले केंद्र किल्लारीचे होते. तेव्हा तातडीने विमान तयार ठेवण्यास सांगून निघण्याची तयारी सुरू केली. सकाळी 6 ला लातूरला पोहोचलो. तेथून भूकंपग्रस्त भाग गाठला. पाहतो तर सर्वत्र हाहाकार उडाला होता.
प्रेताचे खच दिसत होते. सुन्न करणारे चित्र नजरेसमोर होते. अशावेळी वाचलेल्या लोकांना धीर देण्यास सुरुवात केली. जखमींना उपचारासाठी शेजारच्या जिल्ह्यातून वैद्यकीय सेवा मागविली. पाठोपाठ अन्न-पाण्याची सोय अन् मग तात्पुरते निवारे उभारण्याचे काम सुरू केले. पुढे चांगल्या पद्धतीने गावांचे पुनर्वसन करण्यात आले. यात केंद्र, राज्य सरकार, संस्था, नागरिकांनी मोलाची कामगिरी केली. आज इथली माणसे सन्मानाने उभी राहिली, याचा आनंद वाटतो, असे उद्गारही पवार यांनी काढले. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचाही मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, तर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे मानपत्र त्यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी स्वीकारले.