'मिस्ट्री मनी'! धाराशिव जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये ३१ कोटी रुपयांच्या ठेवी पडून, वारस कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:28 IST2025-10-13T15:27:46+5:302025-10-13T15:28:10+5:30
धाराशिव जिल्ह्यातील बँकांत ३१ काेटी रुपये पडून! दहा वर्षांपासून दावा न केलेल्या ठेवी

'मिस्ट्री मनी'! धाराशिव जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये ३१ कोटी रुपयांच्या ठेवी पडून, वारस कोण?
धाराशिव : जिल्ह्यातील वेगवेगळ्या बँकांमध्ये तब्बल दहा वर्षांपासून काेणीही दावा न केलेले थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल ३१ काेटी रुपये पडून असल्याची माहिती समाेर आली आहे. हे पैसे संबंधित खातेदार वा वारसांना परत करण्यासाठी अग्रणी बँकेने ठाेस पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यातील विविध बँकांमधील वैयक्तिक, संस्थात्मक आणि सरकारी योजनांच्या खात्यांमध्ये सुमारे ३१ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी पडून आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, सलग १० वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित केल्या जातात. या पार्श्वभूमीवर संबंधित रक्कम खातेदार वा त्यांच्या वारसांना परत करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेच्या नेतृत्वात माेहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, या विशेष मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे, ग्राहक भेटी आणि माहितीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार असून, १ लाख ४३ हजार ९६९ खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक चिन्मय दास यांनी केले आहे.