येरमाळा (जि. धाराशिव) : कळंब तालुक्यातील चोराखळी येथील 'महाकाली कला केंद्रा'तील कार्यक्रम पाहून परतत असताना, जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी पाच मित्रांनी मिळून आपल्याच एका सोबत्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत केज तालुक्यातील साळेगाव येथील सतीश भागवत मुंडे (वय ३७) या तरुणाचा मृत्यू झाला असून, येरमाळा पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयित मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे महाकाली कला केंद्र पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सतीश मुंडे हा आपल्या पाच मित्रांसह १२ फेब्रुवारीच्या रात्री साडेदहाच्या सुमारास चोराखळी येथील महाकाली कला केंद्रात नृत्य पाहण्यासाठी आला होता. मध्यरात्री एक वाजेपर्यंत सर्वांनी कार्यक्रम पाहिला. फिर्यादीनुसार, संशयित आरोपींनी सतीशला आधी दारू पाजली आणि त्यानंतर साळेगावकडे परतत असताना जुन्या वादाचा राग मनात धरून त्याला गाठले. चालत्या वाहनात किंवा वाटेत सतीशला लाथाबुक्क्यांनी पोटावर आणि छातीवर इतकी अमानुष मारहाण केली की, त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयताचे वडील भागवत बळीराम मुंडे यांनी १५ फेब्रुवारीच्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास येरमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून येरमाळा पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून पाचही संशयितांना ताब्यात घेतले आहे. हा खून नेमका कोणत्या कारणावरून झाला? आणि मारहाण नेमकी कोठे करण्यात आली? याचा सखोल तपास पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे हे करत आहेत.
हे आहेत संशयित आरोपी...शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्धन गिते, मधुकर गोरोबा इंगळे, दत्ता बाबासाहेब तोंडे (सर्व रा. साळेगाव, ता. केज, जि. बीड) या पाच संशयितांविरुद्ध गुन्हा नाेंदवून बेड्या ठाेकल्या.
कला केंद्र पुन्हा वादात!चोराखळी येथील कला केंद्रांमध्ये होणारी गर्दी आणि त्यातून उद्भवणारे वाद यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. एका तरुणाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अशा केंद्रांवर पोलिसांचा वचक असायला हवा, अशी मागणी ग्रामस्थांतून हाेत आहे.
Web Summary : After a night of dance and drinking, a man was brutally murdered by his friends near Yeramala. Police arrested five suspects from Salegaon. Old rivalry is suspected as the motive. The incident has raised concerns about safety at the art center.
Web Summary : येरमाला के पास नाच-गाने और शराब पीने के बाद एक व्यक्ति की उसके दोस्तों ने बेरहमी से हत्या कर दी। पुलिस ने सालेगांव से पांच संदिग्धों को गिरफ्तार किया। पुरानी रंजिश का शक है। कला केंद्र पर सुरक्षा को लेकर चिंता जताई गई है।