अडीच वर्षांच्या बाळाला आईने विकले १० हजारांत; पतीच्या आत्महत्येनंतर थाटला दुसऱ्यासोबत संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 06:30 IST2025-07-27T06:29:25+5:302025-07-27T06:30:50+5:30
बालकल्याण समितीने या बाळास शिशुगृहात दाखल केले असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अडीच वर्षांच्या बाळाला आईने विकले १० हजारांत; पतीच्या आत्महत्येनंतर थाटला दुसऱ्यासोबत संसार
लोकमत न्यूज नेटवर्क, धाराशिव : पतीच्या आत्महत्येनंतर आपल्या अडीच वर्षीय बाळाला १० हजार रुपयांत नोटरीवर दत्तक विधान करून देत महिलेने दुसऱ्याशी संसार थाटल्याची घटना शनिवारी धाराशिवमध्ये उजेडात आली. बालकल्याण समितीने या बाळास शिशुगृहात दाखल केले असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील महिलेचा चार वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील तरुणाशी विवाह झाला. तरुण घरजावई म्हणून महिलेच्या गावात राहत होता. त्यांना एक गोंडस बाळ झाले. मात्र, काही महिन्यांपासून दोघांमध्ये वाद होऊ लागले. हे वाद एवढे विकाेपाला गेले की यातूनच तीन महिन्यांपूर्वी पतीने आत्महत्या केली.
त्यानंतर मे ते जूनदरम्यान, महिलेने सोलापूर जिल्ह्यातील नात्यातीलच एका कुटुंबासाेबत चाळीसगाव येथे १० हजारात नोटरीवर दत्तक विधान करून बाळाला त्यांच्या स्वाधीन केले व अन्य पुरुषाशी लग्न करून ती त्याच्याकडे निघून गेली.
सासूमुळे प्रकार उघडकीस
महिलेच्या सासूने नातवाचा ताबा मिळावा, म्हणून महिलेच्या माहेरी चौकशी केली असता, बाळ व महिला दोघेही तेथे नसल्याचे समजले. त्यामुळे सासूने पोलिसात तक्रार केली. यानंतर मुंबईच्या दामिनी व बीड येथील निर्धार स्वयंसेवी संस्थेच्या पाठपुराव्याने पोलिसांनी बाळाचा पत्ता शोधला. संबंधित कुटुंबाकडून बाळ ताब्यात घेऊन त्यास २४ जुलै रोजी धाराशिवच्या बालकल्याण समितीकडे दाखल केले.
ताब्यावरून झाला वाद : नोटरीवर दत्तक विधान करून घेतलेले कुटुंब व मुलाची आजी शनिवारी ताब्यासाठी धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, नोटरीवर दत्तक विधान कायदेशीर नसल्याने बाळाचा ताबा सोलापूरच्या कुटुंबास मिळू शकत नसल्याचे बालकल्याण समितीने स्पष्ट केले आहे.