ड्रग्ज प्रकरणात आरोप आईवर, शिक्षा चिमुरडीला; मायेची ऊब, दुग्धपानासाठी चिमुकली कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:44 IST2025-02-27T13:43:25+5:302025-02-27T13:44:03+5:30

अवघ्या एक वर्षाच्या चिमुरडीच्या आईवर ड्रग्ज पुरवठ्याचे आरोप असल्याने ती सध्या तामलवाडी पोलिसांच्या कोठडीत आहे.

Mother charged in drug case, child going to the closet for mothers love and breast milk | ड्रग्ज प्रकरणात आरोप आईवर, शिक्षा चिमुरडीला; मायेची ऊब, दुग्धपानासाठी चिमुकली कोठडीत

ड्रग्ज प्रकरणात आरोप आईवर, शिक्षा चिमुरडीला; मायेची ऊब, दुग्धपानासाठी चिमुकली कोठडीत

- संतोष मगर
तामलवाडी (जि. धाराशिव) :
जाणते-अजाणतेपणी हातून घडलेल्या चुकांची झळ आपल्यासोबतच आपल्यावर अवलंबित्व असलेल्यांनाही बसत असते. असाच एक हृदयद्रावक प्रकार तामलवाडीत समोर आला आहे. अवघ्या एक वर्षाच्या चिमुरडीच्या आईवर ड्रग्ज पुरवठ्याचे आरोप असल्याने ती सध्या तामलवाडी पोलिसांच्या कोठडीत आहे. त्यामुळे मायेची ऊब मिळवण्यासाठी या चिमुरडीवर दिवसातून दोन-तीन वेळा कोठडीत जाण्याची वेळ आली आहे.

सोलापूर-धुळे महामार्गावरील तामलवाडी टोल नाक्यावर १४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एमडी ड्रग्ज पकडण्यात आले होते. यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासामध्ये या ड्रग्जचा पुरवठा हा मुंबई येथील संगीता गोले नावाच्या महिलेने केल्याचे समोर आले. यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीने धाराशिव पोलिसांनी या महिलेस २२ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. न्यायालयाने तिला ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे ही महिला सध्या तामलवाडी पोलिसांच्या कोठडीत आहे. या महिलेला ८ वर्षांचा एक मुलगा व १ वर्षाची मुलगी आहे. मुलगी लहान असल्याने आरोपी महिलेच्या मानलेल्या भावाने तिला सोबतच तामलवाडीला आणले आहे. सध्या ही चिमुरडी व आरोपीचा मानलेला भाऊ तामलवाडी येथील एका लॉजवर राहत आहेत.

दुग्धपानासाठी चिमुकली कोठडीत
दरम्यान, मुलगी लहान असल्याने तिला दुग्धपानासाठी आईकडे जावे लागते. त्यामुळे तिचा हा मामा तिला गरजेनुसार दिवसातून दोन-तीन वेळा पोलिस ठाण्यात घेऊन जातो. काही वेळासाठी कोठडीत मुलीला सोडून दुग्धपानानंतर पुन्हा बाहेर घेऊन जातो. या चिमुरडीच्या आरोपी आईचा ड्रग्ज प्रकरणातील सहभाग, दोष अजून सिद्ध होण्यास वेळ असला तरी तूर्त तिच्या मुलीला अशी शिक्षा भोगावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Mother charged in drug case, child going to the closet for mothers love and breast milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.