पीक नुकसानीच्या भरपाईसाठी मनसे उतरली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST2021-08-18T04:39:05+5:302021-08-18T04:39:05+5:30

ढोकी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शासनाने त्वरित २५ हजार रुपयांची मदत करावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने ...

MNS took to the streets to compensate for crop losses | पीक नुकसानीच्या भरपाईसाठी मनसे उतरली रस्त्यावर

पीक नुकसानीच्या भरपाईसाठी मनसे उतरली रस्त्यावर

ढोकी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शासनाने त्वरित २५ हजार रुपयांची मदत करावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने मंगळवारी ढोकी येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

यावर्षी सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे खरिपाची पिके समाधानकारक आली. परंतु, पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी मनसेच्या वतीने यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ५७.२ टक्केच पाऊस झाला असून, अनेक मंडळामध्ये पावसाचा २२ दिवसांचा खंड पडला आहे. याशिवाय, वीज भारनियमन व इतर कारणांमुळे पिकांना सरसकट पाणी देणेही शेतकऱ्यांना शक्य होत नाही. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना शासन निर्णयामधील तरतुदीनुसार शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर हवामानातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसानभरपाई निश्चित करून त्या नुकसानभरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.

यानुसार केंद्र व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पैसेवारीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यात यावी, या मागणीसाठी ढोकी बस स्थानकासमोर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक अमरराजे कदम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वैशालीताई गायकवाड, सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कोठावळे, कळंब तालुकाध्यक्ष सागर बारकूल, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख, शहराध्यक्ष संजय पवार, तालुका उपाध्यक्ष सलीम औटी, मन्नान पठाण, अलाउद्दीन औटी, अमोल थोडसरे, जमीर औटी, शाम अडसुळे, विनोद गायकवाड, धनंजय वराळे, इम्रान शेख यांच्यासह मनसे सैनिक हजर होते.

Web Title: MNS took to the streets to compensate for crop losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.