तुळजापूरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या भावावर गोळीबार; ६ आरोपींना कोठडी, दोन फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:57 IST2025-12-19T19:56:39+5:302025-12-19T19:57:27+5:30
या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, सूरज साठे आणि बालाजी गंगणे हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

तुळजापूरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या भावावर गोळीबार; ६ आरोपींना कोठडी, दोन फरार
तुळजापूर : शहरात राजकीय प्रचाराच्या वादातून कुलदीप मगर यांच्यावर गोळीबार करून, त्यानंतर कोयता व धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ६ आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, सूरज साठे आणि बालाजी गंगणे हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
आगामी पालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचे चुलत भाऊ कुलदीप मगर यांच्यावर राजकीय प्रचाराच्या वादातून गोळीबारसह कोयता, धारादार शस्त्राने मंगळवारी हल्ला झाला होता. यावेळी शुभम साठे आणि सागर गंगणे याला जखमी अवस्थेत असलेले कुलदीप मगर यांनी पकडून घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस प्रशासनाच्या ताब्यात दिले होते. तर अन्य आरोपी घटनास्थळावरून पोलिस येताच फरार झाले होते. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात कुलदीप मगर यांच्या एमएलसी जबाबावरुन आठजणांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा नोंद होताच फरार झालेल्या चेतन शिंदे, शेखर किरण गंगणे, नंदू गंगणे, अतुल दळवी यांना पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली.
यानंतर गुरुवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचे गांभीर्य, वापरण्यात आलेली बेकायदेशीर शस्त्रे तसेच इतर फरार आरोपींचा शोध घेणे आवश्यक असल्याचे कारण पुढे करत पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजुच्या वकिलांची बाजू ऐकून घेऊन सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व अटक आरोपींना २३ डिसेंबर पर्यतची पोलिस कोठडी सुनावली आहे.
'मविआ' पदाधिकाऱ्यांचा पोलिस ठाण्यात ठिय्या
दरम्यान गोळीबार व कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कुलदीप मगर हे शुद्धीत नसतानाच पोलिस प्रशासनाने घाईगडबडीत अर्धवट जबाब नोंदविल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. शुद्धीवर आल्यानंतर पुरवणी जबाब नोंदविण्याचे पोलिस प्रशासनाने आश्वासन देऊनही तो मुद्दाम टाळण्यात येत असल्याचा आरोपही होत आहे. यामुळे गुरुवारी ठाकरे गटाचे युवक नेते ऋषिकेश मगर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी तुळजापूर पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.
राजकीय दबावाचा आरोप
यावेळी बोलताना ऋषिकेश मगर यांनी पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव असल्यानेच पुरवणी जबाब घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच पोलिसांकडून टाळाटाळ सुरूच राहिल्यास जखमी अवस्थेत असलेले कुलदीप मगर यांना आहेत त्या परिस्थितीत पोलीस ठाण्यात बसविण्यात येईल, असा थेट इशारा देण्यात आला.
खासदारांनी केली मध्यस्थी
दरम्यान, खा. ओमराजे निंबाळकर यांनी पोलिस निरीक्षकांशी फोनद्वारे संपर्क साधून हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांचे एक पथक जखमीचा पुरवणी जबाब नोंदविण्यासाठी सोलापूरकडे रवाना झाले. या पुरवणी जबाबातून नवे धक्कादायक खुलासे होण्यासह आणखी आरोपींची नावे पुढे येण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.