पायऱ्या काढून रस्ता करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:45 IST2021-01-08T05:45:34+5:302021-01-08T05:45:34+5:30
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिरापासून शुक्रवार पेठ भागाकडे जाणाऱ्या पायऱ्या काढून रस्ता तयार करावा, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ...

पायऱ्या काढून रस्ता करा
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिरापासून शुक्रवार पेठ भागाकडे जाणाऱ्या पायऱ्या काढून रस्ता तयार करावा, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते श्री तुळजाभवानी मंदिर-शुक्रवार पेठ या रस्त्यावर पथदिवे बसवावेत, तसेच प्राधिकरणामार्फत तयार केलेल्या ड्रेनेज लाइनवरील चेंबर दुरुस्त करण्याची मागणी नगरसेवक सुनील रोचकरी यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, श्री तुळजाभवानी मंदिरापासून शुक्रवार पेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायऱ्या असून, पार्किंगसाठी त्याचा उपयोग होत आहे. या पायऱ्यांवरून जाता येत नाही. पायऱ्याच्या दोन्ही बाजूला ५ फुटांचा रस्ता असून, त्यावरील आणि पायऱ्यांवरील दगड निघून खड्डे पडलेले आहेत. येथे महिला, वयोवृद्ध भाविक घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या पायऱ्या काढून रस्ता बनविणे योग्य होईल.
मागील ५ वर्षांपासून छत्रपती शिवाजी चौक ते श्री तुळजाभवानी मंदिर ते शुक्रवार पेठ या महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी लाइटची सोय नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरते. लाइट नसल्यामुळे सदर रस्त्यावर रात्री व पहाटेच्या वेळी चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे येथे तात्काळ लाइटची व्यवस्था करण्यात यावी, तसेच शहरात प्राधिकरणामार्फत तयार केलेल्या ड्रेनेज लाइनवरील चेंबर काही ठिकाणी खराब झाले आहेत, खचले आहेत. त्यामुळे बऱ्याच भाविकांना व शहरवासीयांना दुखापत झाली आहे. त्यामुळे शहरातील ड्रेनेज लाइनवरील चेंबर लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी रोचकरी यांनी केली आहे.