Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीसोबत काँग्रेसकडूनही तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 17:47 IST2019-03-20T17:41:57+5:302019-03-20T17:47:34+5:30
काँग्रेसकडून नुकत्याच जिल्हाभर पार पडलेल्या बैठका मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याच्या चर्चेला बळ पुरविताना दिसून येत आहेत़

Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीसोबत काँग्रेसकडूनही तयारी सुरू
उस्मानाबाद : लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींत दोन घडामोडींनी भर पडली आहे़ भेटीगाठींनी हा विषय तापता ठेवून दिल्यामुळे मतदारसंघात सध्या वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात आहे़ यादरम्यान, काँग्रेसकडून नुकत्याच जिल्हाभर पार पडलेल्या बैठका मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याच्या चर्चेला बळ पुरविताना दिसून येत आहेत़
आघाडीत उस्मानाबाद मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे़ येथून माजी मंत्री आ़ राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे़ मात्र, गेल्या काही दिवसांपासून वेगळेच वारे वाहू लागले आहेत़ लातूर व उस्मानाबादच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिवराज पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडवून घेण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे. यावर गेले दोन दिवस जोरदार चर्चा झडत असतानाच सोमवारी रात्री राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवराज पाटील चाकूरकरांची घेतलेली भेट व मंगळवारी दुपारी शरद पवार व राहुल गांधी यांच्यात झालेली बैठक या चर्चांना बळ पुरवित गेली.
मात्र, पाटील व चाकूरकर यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली असली तरी, उमेदवार कोणत्या का पक्षाचा असेना, मतभेद संपवून एकदिलाने काम करण्यावर जोर देण्यात आल्याचे दोन्हीकडून सांगण्यात आले आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढविण्यासंदर्भात तयारी पूर्ण केली आहे़ जिल्हाभर बैठका, मेळावे घेण्यात आले असून, आता बुथस्तरावरील कामकाज सुरु करण्यात आले आहे़ यादरम्यान, काँग्रेसनेही आता आपली तयारी सुरु केलेली आहे़ गेल्या काही दिवसांत पदाधिकाऱ्यांनी झाडून सगळ्या तालुक्यांत कार्यकर्त्यांच्या बैठका घेत सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत़
सोमवारीच त्यांनी जिल्हास्तरीय बैठकही घेतली आहे़ दोन्ही पक्षाकडून आपापल्या स्तरावर तयारी सुरु झाली आहे. ऐनवेळी कोणताही निर्णय झाला तरी लढण्यास आपापली सेना सज्ज राखण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु आहेत़
यासंदर्भात काँग्रेसचे आ़मधुकरराव चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आघाडीधर्म पाळण्यासाठीच बैठका सुरु असल्याचे असल्याचे सांगितले. उमेदवार कोणाचाही असला तरी दोघांकडूनही असेच काम सुरु राहील, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे आ़राणाजगजितसिंह पाटील यांनीही जागा कोणत्या पक्षाला सोडायची याचा निर्णय हे पक्षाध्यक्ष शरद पवार व राहुल गांधी हे दोघेच ठरवतील, त्यांचा आदेश प्रमाण मानून आघाडीचा धर्म पाळण्यात येईल, असे सांगितले़
सेनेचा उमेदवार आज ठरणार?
एकीकडे आघाडीत जागेचा पेच फसलेला असताना सेनेत उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे़ विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना विरोध करणारा एक गट अत्यंत सक्रिय झाल्याने येथील उमेदवार निश्चिती लांबणीवर पडली आहे़ आज-उद्या करता करता एकेक दिवस मागे पडत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत़ यानुषंगाने उमेदवारीचा निर्णय लवकरच घेण्याची हालचाल सेनेत सुरु आहे़ बुधवारी उमेदवार निश्चित होण्याची शक्यता, सेनेचे पदाधिकारी वर्तवीत आहेत़