शिंदेसेनेत प्रवेश कर, अन्यथा जगू देणार नाही; धाराशिवमध्ये ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यास मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:38 IST2025-05-26T17:38:12+5:302025-05-26T17:38:55+5:30
याप्रकरणी चौघांविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदेसेनेत प्रवेश कर, अन्यथा जगू देणार नाही; धाराशिवमध्ये ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यास मारहाण
धाराशिव : शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश का करीत नाहीस व संदेश जाधव याच्याविरुद्धच्या गुन्ह्यात साक्षीदार का झालास, अशी विचारणा करीत चौघांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहरातील काकडे प्लाॅट भागात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे पदाधिकारी प्रशांत ऊर्फ बापू साळुंके हे २३ मे राेजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून धाराशिव तहसील कार्यालयात जात हाेते. दुपारी ३:५० वाजता ते काकडे प्लाॅट येथे पाेहाेचले असता, सुदर्शन ऊर्फ विशाल आण्णा गाढवे, विनाेद ऊर्फ अमाेल विलास जाधव व अन्य दाेघा अनोळखी व्यक्तींनी माझी दुचाकी थांबवून ‘‘तू शिंदे गटात प्रवेश का करीत नाहीस व संदेश जाधव याच्याविरुद्धच्या गुन्ह्यात साक्षीदार का झालास?’’ अशी विचारणा केली. त्यावर ‘‘प्रवेश करायचा की नाही, माझी मर्जी आहे’’, असे म्हटल्यानंतर त्यांनी बेदम मारहाण केली.
मोठ्याने ओरडल्यानंतर तिथे दत्ता सोकांडे, युवराज राठोड व इतर लोक, मुले धावत आली. यानंतर चौघे पळून गेले. जाताना त्यांनी ‘‘तू शिंदे गटात प्रवेश केला तरच जगू देऊ’’, अशी धमकी देऊन निघून गेल्याचे साळुंके यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून उपरोक्त चौघांविरुद्ध विविध कलमान्वये आनंदनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.