रक्षाबंधनाच्या माध्यमातून जपला भाईचारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:37 IST2021-08-25T04:37:27+5:302021-08-25T04:37:27+5:30
कळंब : तालुक्यातील शेळका धानोरा येथे हिंदू-मुस्लीम समाजातील ‘भाईचारा’ जपणारा उपक्रम रक्षाबंधनाच्या निमित्ताने युवासेनेने आयोजित केला होता. यावेळी दोन्ही ...

रक्षाबंधनाच्या माध्यमातून जपला भाईचारा
कळंब : तालुक्यातील शेळका धानोरा येथे हिंदू-मुस्लीम समाजातील ‘भाईचारा’ जपणारा उपक्रम रक्षाबंधनाच्या निमित्ताने युवासेनेने आयोजित केला होता. यावेळी दोन्ही समाजांतील व्यक्तिंनी एकमेकांना राखीच्या धाग्यात बांधून घेत, सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले.
जवळपास चौदाशे लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील शेळका धानोरा या गावात मुस्लीम समाजाची जेमतेम सत्तरेक लोकसंख्या आहे. अशा या गावात विविध धर्मीयांचे लोक आनंदात राहतात. विशेषतः बहुसंख्य हिंदुंच्या विविध सणांमध्ये मुस्लीम बांधव सहभागी होत असतात. दोन्ही समाजांतील हा भाईचारा कायम राहावा, यासाठी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते हे युवासेनेच्या माध्यमातून मागी दोन वर्षांपासून गावात रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम समाजातील व्यक्तिंचा रक्षाबंधन सोहळा आयोजित करतात. यंदा या अभिनव उपक्रमाचे तिसरे वर्ष होते. यावेळी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील, युवासेना राज्य विस्तारक नितीन लांडगे, विधानसभा प्रमुख सचिन काळे, शहरप्रमुख प्रदीप मेटे, मनोहर धोंगडे आदी उपस्थित होते.
यावेळी संयोजक तथा युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते यांनी गावात सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत असून, हा एकोपा कायम राहावा, यासाठीच हा उपक्रम आयोजित केला जात असल्याचे सांगितले. खा.राजेनिंबाळकर, आ.पाटील यांनीही सामाजिक एकोपा जपणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शिवसेनेचे शाखाप्रमुख सुनील शेळके, धर्मराज शेळके, उपसरपंच शीला इंगळे, ग्रा.पं. सदस्य विद्या बाराते, जयश्री शेळके, सुनील पुरेकर, श्याम शिंदे, शहाजी शेळके, तुराबद्दिन सय्यद, विश्वा लोकरे, समाधान शेळके, ऋषी पुरेकर, गजानन पुरेकर, भालचंद्र सव्वाशे, विशाल पुरेकर, राजा कसबे, तसेच गावातील विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
चौकट...
दोन्ही समाज राखीच्या बंधनात
यावेळी गावातील मुस्लीम मुलं, युवक व ज्येष्ठांना हिंदू समाजातील भगिनींनी राखी बांधली, तर मुस्लीम मुलींनी इतर समाजातील व्यक्तींना राखी बांधली. गावातील सामाजिक एकता यातून दिसून आली.
सिमेंट रस्त्याचे लोकार्पण
यावेळी गावात ग्रामविकास विभागाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्ता कामाचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.