मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी तुळजापुरात जागरण गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 19:20 IST2020-10-04T19:20:12+5:302020-10-04T19:20:43+5:30
सरकारने न्यायालयात भक्कम बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा दि. ९ ऑक्टोबर रोजी तुळजापुरात तुळजाभवानी महाद्वारात जागरण गोंधळ घालण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मराठा आरक्षणासाठी शुक्रवारी तुळजापुरात जागरण गोंधळ
तुळजापूर : सरकारने न्यायालयात भक्कम बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अन्यथा दि. ९ ऑक्टोबर रोजी तुळजापुरात छत्रपती संभाजी राजे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा काढून तुळजाभवानी महाद्वारात जागरण गोंधळ घालण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचे समन्वयक तथा तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिला.
रविवारी तुळजापूर येथील पुजारी मंगल कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा क्रांती जागर मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीेने पार पाडण्यासाठी मराठा युवकांच्या दररोज बैठका होत आहेत. तसेच या मोर्चात सहभागी होणाऱ्या समाजबांधवांची कोरोना संक्रमण बचावासाठी सर्व ती खबरदारी नगर परिषद घेणार आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स यांचे पालन करण्याचे निर्देश सहभागी मोर्चेकरांना दिले जातील, अशी माहिती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली.
केंद्र व राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात मांडण्यास कमी पडल्याने मराठा आरक्षणावर स्थगिती आली आहे. ही स्थगिती ९ तारखेच्या आत उठल्यास तुळजापुरात मराठा जागर मोर्चा ऐवजी आनंदोत्सव साजरा करू, असेही साळुंके यावेळी म्हणाले.