कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार, वाशीरा नदीला पूर; शेकडो एकर पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:29 IST2025-08-15T09:29:04+5:302025-08-15T09:29:26+5:30
रस्ते बंद; शेती जलमय, जनजीवन विस्कळीत

कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार, वाशीरा नदीला पूर; शेकडो एकर पिकांचे नुकसान
बालाजी अडसूळ, कळंब (जि. धाराशिव) : कळंब तालुक्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे वाशीरा नदीला प्रचंड पूर आला आहे. या पुरामुळे इटकूर, आथर्डी, आडसुळवाडी, बोरगाव ध आदी गावांमधील शेती आणि जनजीवनाचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की, १०० फूट रुंदीचे पात्र सोडून पाणी अर्धा ते पाऊण किलोमीटरपर्यंत पसरले आहे. यामुळे शेकडो एकर शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.
ढगफुटीसदृश्य पाऊस: बालाघाटाच्या डोंगररांगांमध्ये उगम पावणाऱ्या मांजरा नदीची उपनदी असलेल्या वाशीरा नदीच्या खोऱ्यात गुरुवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला होता. मध्यरात्रीच्या सुमारास बोरगाव धनेश्वरी, इटकूर, गंभिरवाडी या शिवारात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला, ज्यामुळे नदीला अचानक पूर आला.
शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान: पुराच्या पाण्याने सोयाबीन, ऊस यांसारखी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आडसुळवाडी, इटकूर, आथर्डी येथील असंख्य शेतकऱ्यांचे हेक्टरो पिक पूर्णपणे पाण्यात बुडाले आहेत. इटकूर येथील मधुकर आडसुळ यांच्या शेतातील घर आणि संसार पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच, अनेक शेतकऱ्यांचे गोठेही पाण्याने वेढले आहेत.
वाहतूक ठप्प: पुराच्या पाण्यामुळे परिसरातील वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे. कळंब-पारा-वाशी आणि कळंब-लातूर-भाटसांगवी हे दोन्ही महत्त्वाचे राज्यमार्ग इटकूर आणि आथर्डी येथील पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार, वाशीरा नदीला पूर; शेकडो एकर पिकांचे नुकसान, रस्ते बंद, जनजीवन विस्कळीत. #RAIN#Monsoon#dharashivpic.twitter.com/ZQzjGG9ii0
— Lokmat (@lokmat) August 15, 2025