अतिवृष्टीने जमिनी खरडून गेल्याने शंभर एकर क्षेत्र राहणार पेरणीविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:13 IST2020-11-02T16:12:28+5:302020-11-02T16:13:41+5:30
पुराचे पाणी शेतात घुसून ओढ्याकाठच्या, तलावाच्या सांडव्याशेजारील जमिनी अक्षरश: खरडून गेला.

अतिवृष्टीने जमिनी खरडून गेल्याने शंभर एकर क्षेत्र राहणार पेरणीविना
तामलवाडी (जिल्हा उस्मानाबाद) : मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीवेळी पुराच्या तडाख्याने ओढ्या काठच्या जमीनी खरडुन गेल्याने त्या आता नापिक बनल्या आहेत. त्यामुये यंदाच्या रबी हंगामात या भागातील जवळपास १०० एकर पेरणी विना राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
१४ आक्टोबर रोजी तामलवाडी भागात अतिवृष्टीचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला. पुराचे पाणी शेतात घुसून ओढ्याकाठच्या, तलावाच्या सांडव्याशेजारील जमिनी अक्षरश: खरडून गेला. यामुळे सांगवी, सुरतगांव तामलवाडी देवकुरुळी वडगांव कदमवाडी पिंपळा बु शिवारातील शेतातील माती घासून जमीन नापीक बनली. सध्या बहुतांश जमिनीवर खड्डे , अन् दगड-गोटे शिल्लक आहेत. घासून गेलेला गाळ पुन्हा कुठून व कसा भरायचा? यासाठी पैसा कसा उभा करायचा, असे प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहेत. शिवाय पुराच्या पाण्याने जमिनीसोबतच विहरीचे देखील मोठे नुकसान झाले. अनेकांचे बांध फूटले असून, शंभरावर विहरी गाळाने बुजल्या आहेत. त्यामुळे जमीन दुरूस्तीसाठी शासनाने मदत करण्याची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
जनावराच्या आजाराचे प्रमाण वाढले
तामलवाडी भागात पाळीव जनावरांच्या आजाराच्या प्रमाणात वाढ. होत आहे. संसर्गजन्य आजाराचा फैलाव उपचारानंतर कमी होत नसल्याने पशुपालक चिंताग्रस्त आहेत. लम्पी स्किनसदृश्य आजारानेही अनेक जनावरे त्रस्त आहेत. ऐन रबी पेरणीच्या मोसमात बैलाना आजार जडत असल्याने शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभारले आहे
विहीर नुकसानीच्या २५ तक्रारी
अतिवृष्टीच्या पुराचे पाणी ओढ्या काठच्या विहिरीत शिरल्याने त्या गाळाने भरल्याच्या तक्रारी २५ शेतकऱ्यांनी केल्या आहेत. याशिवाय जमीन खरडून झालेल्या नुकसानीचा अहवाल देखील वरिष्ठांनी मागवून घेतल्यास तो सादर केला जाणार असल्याची माहिती कृषी सहाय्यक आर. पी. संकपाळ यानी दिली.
शेतकऱ्यांना भरीव मदत करावी
नुकसानीपोटी शासनाने हेक्टरी अनुदान जाहीर केले. परंतु, जमीन पुराच्या पाण्याने खरडून जाऊन विहीर व बोअर देखीलगाळाने बुजले आहे हे नुकसान नाही का यासाठी यंदा रबी हंगामात खरडुन गेलेल्या जमिनीत पेरणी करता येत नाही. यामुळे जमिनी नापीक बनल्या असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याना भरीव मदत करावी.
- नागनाथ मुरलीधर मगर, शेतकरी, सांगवी