केंद्र सरकारच्या निर्णयाने सुवर्ण व्यापारी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:45+5:302021-07-19T04:21:45+5:30
कळंब : सोन्याच्या दागिन्यांसाठी केंद्र सरकारने अनिवार्य केलेल्या हॉलमार्कचे स्वागत सराफ व सुवर्णकारांनी केले; मात्र त्यासाठी सरकारने लादलेल्या अटींमुळे ...

केंद्र सरकारच्या निर्णयाने सुवर्ण व्यापारी नाराज
कळंब : सोन्याच्या दागिन्यांसाठी केंद्र सरकारने अनिवार्य केलेल्या हॉलमार्कचे स्वागत सराफ व सुवर्णकारांनी केले; मात्र त्यासाठी सरकारने लादलेल्या अटींमुळे सराफ व सुवर्णकारांची फसगत झाल्याची भावना सीएआयटी या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर गोरे यांनी व्यक्त केली.
करोनासारख्या महामारीमुळे सर्व व्यवसाय आर्थिक नुकसानीत आहेत. यामध्ये केंद्र सरकारने हॉलमार्क कायदा जूनपासून अनिवार्य केला व भारतातील सर्व सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांनी स्वागत करत मान्यही केला. हॉलमार्क कायदा लागू केल्यानंतर केद्र सरकारशी अखिल भारतीय सुवर्ण दागिने संघाच्या माध्यमातून चर्चा केल्या व निवेदनही देण्यात आले. यामध्ये सरकारकडून हॉलमार्क कायद्याच्या अंमलबजावणीआधी सुविधा वाढविण्याची तसेच दुकानातील स्टॉकमध्ये असलेल्या दागिन्यांचे हॉलमार्क करण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली.
देशात फक्त ९३३ हॉलमार्क सेंटर आहेत. प्रत्येक हॉलमार्क सेंटरची क्षमता ३०० नग एवढीच आहे. देशामध्ये आतापर्यंत ५९ हजार ३९० ज्वेलर्स यांनी हॉलमार्क नोंदणीकरण केले आहे. प्रत्यक्षात पाहिले तर सुविधांअभावी स्टॉक वेळेत हॉलमार्क होऊ शकत नाही. त्यामुळे सर्व सराफ व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सराफ व्यावसायिक आपला स्टॉक हॉलमार्क करून कायद्याच्या चौकटीत व्यवसाय करण्यास तयार आहेत. परंतु, हॉलमार्क सेंटरच्या अभावामुळे ते पूर्ण होऊ शकत नाही. दुसरीकडे विभागीय अधिकाऱ्याकडून नोटीस देण्यात येत आहेत. राष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण विक्रेत्यांची संघटना असलेल्या एआयजीजेएफचे अध्यक्ष पंकज अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत शांतीभाई सराफ (गुजरात), अमित जैन (मथुरा), राकेश कुमार, सुशील जैन (दिल्ली), संतोष सराफ (इंदौर), मातादीन सोनी (जयपूर), नितीन केडिया (मुंबई) अशा भारतभरातील विविध राज्यातील सुवर्ण व्यापाऱ्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सचिव राजीव रस्तोगी यांनी दुकानातील स्टॉक दागिन्यांचे हॉलमार्क करण्यास एक वर्ष मुदत वाढ मिळावी, एक वर्ष एचयूआयडी प्रक्रिया थांबवावी, असा ठराव मांडला व सर्वांनी एकमताने मंजूर केला. हा ठराव आता केंद्र सरकारकडे पाठविला जाणार असून त्यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा गोरे यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
चौकट.....
मराठवाड्यात दोनच सेंटर
मराठवाड्यात फक्त नांदेड व औरंगाबाद या ठिकाणी हॉलमार्क सेंटर आहेत. या ठिकाणी जाऊन दागिने हॉलमार्क करणे मोठे जोखमीचे काम झाले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला हॉलमार्क सेंटर असणे आवश्यक आहे. परंतु, मराठवाड्यात दोनच हॉलमार्क सेंटर असल्यामुळे व्यापाऱ्यांची गैरसोय व जोखीम वाढत आहे. त्यामुळे सर्व सराफ व्यावसायिकात असंतोष निर्माण झाला असल्याचे गोरे यांनी सांगितले.