कावलदऱ्यात आढळली भौमितिक रेखाचित्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:45 IST2021-01-08T05:45:32+5:302021-01-08T05:45:32+5:30
उस्मानाबादचा इतिहास व पुरातत्त्व परिषदेचे जयराज खोचरे यांच्या निदर्शनास या ऐतिहासिक खुणा आल्या आहेत. कोकणात जशी मोठ-मोठी कातळशिल्पे व ...

कावलदऱ्यात आढळली भौमितिक रेखाचित्रे
उस्मानाबादचा इतिहास व पुरातत्त्व परिषदेचे जयराज खोचरे यांच्या निदर्शनास या ऐतिहासिक खुणा आल्या आहेत. कोकणात जशी मोठ-मोठी कातळशिल्पे व रेखाचित्रे आहेत, अगदी तशीच नसली तरी त्यांच्याशी साधर्म्य साधणारी ही रेखाचित्रे आहेत. कावलदऱ्यात आढळून आलेली ही रेखाचित्रे मानवनिर्मित असून त्यात गोल, चौकोनी, लंबवर्तुळ चिन्हांकित करण्यात आलेली आहेत. दरम्यान, खोचरे यांनी यासंदर्भात गावातील नागरिकांशी संवाद साधला असता येथील लोक त्यास देवीची पावले संबोधतात, असे समोर आले. कोकणात आढळून येणाऱ्या अशा रेखाचित्रांना भीमाची चूल, पांडव व स्थानिक देवता अशा नावाने ओळखतात. त्याप्रमाणे याही रेखाचित्रांना येथील लोक देवीचे पावले संबोधत आहेत. खोचरे यांनी या रेखाचित्रांची छायाचित्रे पुण्यातील पुरातत्त्व संशोधकांना पाठवून याबाबतची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रथमदर्शनी ही हजारो वर्षांपूर्वीची रेखाचित्रे असतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आगळ्यावेगळ्या पुरातन रेखाचित्रांनी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कोट...
तुळजापूर, उस्मानाबाद, नळदुर्ग, येडशी, बोंबले हनुमान व भोगावती नदीपात्राजवळ आदिम काळातील म्हणजेच ३० हजार वर्षांपूर्वीची सूक्ष्म हत्यारे यापूर्वी आढळून आली आहेत. आता ही अतिशय जुनी रेखाचित्रे निदर्शनास आली आहेत. यावरून भटके जीवन जगणारा मानव या भागात वावरत होता, याचा हा पुरावा असू शकतो. त्याबाबत संशोधनकार्य सुरू आहे.
-जयराज खोचरे, इतिहास व पुरातत्त्व परिषद, उस्मानाबाद