गॅसच्या किमतीमध्ये पुन्हा २५ रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST2021-08-20T04:37:25+5:302021-08-20T04:37:25+5:30
कळंब : अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांच्या यादीत आता गॅसचाही समावेश करावा लागेल एवढा गॅसचा वापर वाढला ...

गॅसच्या किमतीमध्ये पुन्हा २५ रुपयांची वाढ
कळंब : अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांच्या यादीत आता गॅसचाही समावेश करावा लागेल एवढा गॅसचा वापर वाढला असताना गॅसच्या चढत्या किमतीने सर्वसामान्यांना विशेषतः गृहिणींना त्रस्त केल्याचे चित्र आहे. गॅस भडकला तर ग्रामीण भागात चुलीचा पर्याय आहे. मात्र शहरात चुलीचीही व्यवस्था होत नसल्याने कोंडी होत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास ८५ टक्के घरांत गॅस कनेक्शन असल्याची माहिती आहे. शहरी भागात हे प्रमाण जास्त असेल. ग्रामीण भागात सरपण काही प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अजूनही काही कुटुंबांत स्वयंपाकासाठी चुलीचा वापर केला जातो. केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात गॅस पोहोचविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी आता ‘उज्ज्वला २’ ही योजनाही सुरू केली आहे. चुलीच्या धुरापासून मुक्ती व्हावी, त्यापासून महिलांना व कुटुंबाना होणारे आजार टळावेत, वेळेची बचत व्हावी व स्वच्छ अन्न मिळावे ही उदात्त भूमिका सरकारची असली तरी वाढत्या किमतीने हा उद्देश पूर्ण होईल का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
या वर्षी म्हणजे जानेवारी २०२१ पासून गॅसच्या किमतीत जवळपास १६० रुपये वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये ७१० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता ८७६ रुपयांना मिळत आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात याच सिलिंडरची किंमत ६१० रुपये होती, ती आता तब्बल २६६ रुपयांनी वाढली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षभर सातत्याने किंमत वाढत राहिली आहे. त्यामुळे गॅसचा वापर करावा की नाही, असा प्रश्नही सर्वसामान्यांतून विचारला जातो आहे.
चौकट
छोटे सिलिंडरही महागले
५ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही १० रुपयांची वाढ झाली आहे. ३१५ रुपयांना मिळणारा हा सिलिंडर आता ३२५ रुपयांना मिळत आहे. त्यामुळे छोटे सिलिंडर वापरणाऱ्या कुटुंबांनाही गॅस दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.