‘शैक्षणिक गुंतवणूकीसाठी डॉलर पाठवलेत, सोडवून घ्या’ म्हणत शिक्षकाची ४६ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 13:01 IST2024-06-26T12:59:09+5:302024-06-26T13:01:12+5:30
आपल्याला भारतात शैक्षणिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक करायची आहे, त्यासाठी अमेरिकन डॉलर पाठविले आहेत, अशी थाप भामट्यांकडून मारण्यात आली.

‘शैक्षणिक गुंतवणूकीसाठी डॉलर पाठवलेत, सोडवून घ्या’ म्हणत शिक्षकाची ४६ लाखांची फसवणूक
धाराशिव : भारतात शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकन डॉलर पाठवले आहेत, ते टॅक्स भरून सोडवून घ्या, असे सांगत सायबर भामट्यांनी बेंबळी शाळेवर कार्यरत एका शिक्षकास तब्बल ४६ लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सोमवारी धाराशिवच्या सायबर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एका विदेशी महिलेच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटधारकाने तसेच दोन वेगवेगळे मोबाइलधारक, तीन वेगवेगळ्या बँकेतील अकाउंटधारक यांनी बेंबळी येथील शाळेवर कार्यरत असलेल्या एका शिक्षकाशी २९ फेब्रुवारी २०२४ रोजीपासून संपर्क सुरू केला. आपल्याला भारतात शैक्षणिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक करायची आहे, त्यासाठी अमेरिकन डॉलर पाठविले आहेत, अशी थाप या भामट्यांकडून मारण्यात आली. फेसबुक अकाउंटवरून तसेच व्हॉट्सॲपवरूनही संवाद साधत त्यांनी या शिक्षकाला त्यांची थाप खरी भासवली. यानंतरच्या १६ जूनपर्यंत हे भामटे आपण अमेरिकन डॉलर भारतात पाठवले आहेत. ते सोडवून घेण्यासाठी काही टॅक्स भरावा लागतो. तो भरून घ्या, असे या भामट्यांनी सांगितले.
यासाठी इंडिया ओव्हरसीज, आयसीआयसीआय, कॅनरा बँकेतील खाते क्रमांक देऊन त्यावर रक्कम भरावयास सांगितले. उपरोक्त जवळपास चार महिन्यांच्या कालावधीत या शिक्षकाकडून भामट्यांनी या स्वरूपात ४५ लाख ९० हजार १०० रुपये उकळले. नंतर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळणे बंद झाले. भरलेली रक्कमही परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे या शिक्षकाच्या लक्षात आले. त्यांनी सोमवारी धाराशिव येथील सायबर ठाणे गाठून तक्रार दिली असून, आरोपींवर कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम २००८चे कलम ६६ सी, ६६ डी अन्वये गुन्हा नोंदवला आहे.