लोहारा तालुक्यात वीज कोसळून चार महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 19:04 IST2018-09-29T19:03:26+5:302018-09-29T19:04:01+5:30
लोहारा तालुक्यातील कास्ती (खुर्द) शिवारात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने चार महिला गंभीर जखमी झाल्या.

लोहारा तालुक्यात वीज कोसळून चार महिला जखमी
लोहारा (उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील कास्ती (खुर्द) शिवारात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने चार महिला गंभीर जखमी झाल्या. लोहारा ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जखमी महिलांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.
कास्ती (खुर्द) येथील लक्ष्मी तिम्मा माने (वय २५), लक्ष्मी राजू दंडगुले (वय २४), सपना राम साळुंके (वय २५) आणि चंद्रकला दगडू साळुंके (वय ३०) या महिला कास्ती (खुर्द) शिवारातीलच दगडू साळुंके यांच्या शेतातील सोयाबीन काढणीसाठी गेल्या होत्या. सोयाबीनची काढणी सुरू असतानाच साधारपणे दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक मेघ गर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर वाढल्यामुळे चौघीही शेतातीलच पत्र्याच्या शेडमध्ये जावून थांबल्या असता शेडवर अचानक वीज कोसळली. या घटनेत सदरील चारही महिला जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर तातडीने जखमी अवस्थेतील महिलांना लोहारा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.