भरधाव कंटेनरने बैलगाडीला उडविले; चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 23:11 IST2019-12-25T23:11:17+5:302019-12-25T23:11:48+5:30
वेळा अमावस्या सण साजरा करून घराकडे परतत असताना घडला भीषण अपघात

भरधाव कंटेनरने बैलगाडीला उडविले; चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू
उस्मानाबाद - वेळा अमावस्या सण साजरा करून घराकडे परतत असताना भरधाव कंटेनरने बैैलगाडीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव (ज.) पाटीनजीक बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील वडगाव (ज.) येथील शेटे कुटुंबीय वेळा अमावस्या सण साजरा करण्यासाठी बुधवारी सकाळी बैलगाडी घेवून आपल्या शेतात गेले होते. सण साजरा करून ते सायंकळी बैलागडीतूनच गावाकडे परतत होते. ही बैैलगाडी गावाकडे जात असल्याचे पाहून माळवदे आणि पवार कुटुंबियही त्यात बसले. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही बैैलगाडी औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव (ज.) पाटीनजीक आली होती.
याचवेळी औरंगाबादहून उस्मानाबादकडे निघालेल्या भरधाव कंटेनरने (क्र. केए.५६/४६५३) या बैलगाडीस जोराची धडक दिली. या अपघातात दोन महिला, एक मुलगी व एक मुलगा असे चारजण ठार झाले. यापैकी फुनूबाई मंतू पवार (वय ६०), उमा महेश माळवदे (वय ३५), गुजंन माळवदे (वय १२) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर युवराज दत्तात्रय शेटे या पाच वर्षीय चिमुकल्याची उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. दरम्यान, दत्तात्रय नवनाथ शेटे (वय ३४) हे जखमी असून, उस्मानाबाद शहरातील एका खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की, लोखंडी बैलगाडी अक्षरश: चक्काचूर झाली आहे.