२९ लाखाच्या चोरीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचे पाच पथके मागावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 17:26 IST2019-01-10T17:23:31+5:302019-01-10T17:26:10+5:30
चोरीचा घटनाक्रम ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदरील फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

२९ लाखाच्या चोरीचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचे पाच पथके मागावर
परंडा (उस्मानाबाद) : येथील मुख्य बाजारपेठेतील वर्धमान ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी सुमारे २९ लाख ५५ हजाराचा ऐवज अवघ्या ९ मिनिटांत लंपास केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झालेल्या या चोरट्यांच्या शोधार्थ पोलिसांची पाच पथके रवाना झाली आहेत.
शहरातील मंडई पेठेतील मुख्य बाजारपेठेलगत असलेल्या जुनी आडत लाईन भागात बेदमुथा बंधुंचे वर्धमान ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान आहे. बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आठ सशस्त्र चोरट्यांनी तोंडाला मास्क लावून ३ दुचाकी ढकलत दुकानाजवळ आले. त्यांनी अधुनिक पद्धतीच्या कटरने दुकानाचे दोन्ही ‘लॉक’ तोडून दुकानात प्रवेश केला. यानंतर अवघ्या नऊ ते दहा मिनिटाताच दुकानातील सुमारे २९ लाख ५५ हजार रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. दरम्यान, सदरील घटनेमुळे परंडा येथील नागरिकांसोबतच व्यापाऱ्यांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीचा घटनाक्रम ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदरील फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची पाच पथके निर्माण करण्यात आली असून ती रवानाही झाली आहेत.