लोहाऱ्यात गावठी कट्ट्यातून गोळीबार; २८ वर्षीय तरुण जागीच ठार
By बाबुराव चव्हाण | Updated: February 7, 2025 00:01 IST2025-02-07T00:00:52+5:302025-02-07T00:01:15+5:30
गोळीबारात नितीन मृत्युमुखी पडल्यानंतर आरोपी स्वतः लोहारा पोलीस ठाण्यात हजर झाला.

लोहाऱ्यात गावठी कट्ट्यातून गोळीबार; २८ वर्षीय तरुण जागीच ठार
लोहारा (जि. धाराशिव) : सावत्र बहिणीसोबत झालेल्या कौटुंबिक वादातील साक्षीदार असलेल्या एका २८ वर्षीय तरुणावर गावठी कट्टातून गोळीबार करण्यात आला. लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन गोळ्या लागल्याने तो तरुण जागीच ठार झाला.
पोलिसांनी सांगितले, लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील रावण रसाळ व त्याची बहीण या दोघांमध्ये काही महिन्यापूर्वी वाद झाला होता. या कौटुंबिक भांडणात गावातीलच नितीन आरगडे हा साक्षीदार होता. त्यामुळे रावण रसाळ याच्या मनात साक्षीदार आरगडे यांच्याविषयी राग होता. याच रागातून गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रावण हा नितीनच्या शोधात त्याच्या शेतात पोहोचला. याचवेळी नितीन व शेतमजूर राम रसाळ हे दोघेजण तळ्यातील पाण्यात विद्युतपंप बसविण्यासाठी गेले होते. रावण तिथे पोहचला असता, त्यास नितीन दिसला नाही म्हणून तो रामकडे '' नितीन कुठे गेला?'' अशी विचारणा करीत असतानाच नितीन तिथे पोहोचला. काही समजण्याच्या आतच रावणने आपल्याकडील गावठी कट्ट्यातून दोन गोळ्या नितीनवर फायर केल्या. यातील एक छाती जवळ तर दुसरी तोंडाजवळ लागली असता, त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरा लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अजित चिंतले हे करीत आहेत.
मर्डर झाल्याचे सांगत तडक ठाणे गाठले...
गोळीबारात नितीन मृत्युमुखी पडल्यानंतर आरोपी रावण देविदास रसाळ हा स्वतः लोहारा पोलीस ठाण्यात हजर झाला. "लोहारा (खुर्द) येथे मर्डर झाला आहे. त्यास राम रसाळ याने मारले आहे", असे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच स्वतःकडील गावठी कट्टा व दोन गोळ्या पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे यांच्याकडे दिल्या. यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.