तुळजापूर तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 19:06 IST2018-07-19T19:04:49+5:302018-07-19T19:06:36+5:30
सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

तुळजापूर तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
तुळजापूर (उस्मानाबाद ) : सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथे आज पहाटेच्या सुमारास घडली़
बारुळ येथील युवक शेतकरी ज्योतालिंग भीमाशंकर मेनकुदळे (वय ३८) यांचे गावच्या शिवारात कोरडवाहू शेत आहे़ मागील तीन-चार वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेने शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते़ शिवाय राष्ट्रीयकृत बँकेचा असलेला कर्जाचा डोंगर वाढत होता़ शेतातून न मिळणारे उत्पन्न व डोक्यावरील कर्जामुळे या शेतकऱ्याने कामासाठी मुंबई गाठली होती़ परंतु तेथे म्हणावे तसे काम न मिळाल्याने तो हाताश झाला होता़
नापिकी आणि कर्जामुळे हताश झालेल्या ज्योतालिंग मेनकुदळे यांनी गुरूवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरातील पत्र्याच्या आडूस गळफास घेऊन आत्महत्या केली़ या घटनेची तुळजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तपास पोहेकॉ जे.व्ही.शिंदे हे करीत आहेत़ तलाठी संदीप जगदाळे, कृषी सहाय्यक व्ही.डी.माळी यांनीही घटनेचा पंचनामा केला आहे़ मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे़