रंगपंचमी दिनी कुटुंबावर दु:खाच्या छटा; रंगाचा हात धुण्यास गेलेल्या चिमूकल्याचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:53 IST2025-03-20T18:51:34+5:302025-03-20T18:53:20+5:30
खाेताचीवाडी येथे रंगपंचमी दिनीच घडली दुर्दैवी घटना; ही वार्ता समजताच संपूर्ण गावावर शाेककळा पसरली.

रंगपंचमी दिनी कुटुंबावर दु:खाच्या छटा; रंगाचा हात धुण्यास गेलेल्या चिमूकल्याचा बुडून मृत्यू
- बाबूराव चव्हाण
तुळजापूर (जि. धाराशिव) : रंगपंचमी दिनी रंगांची उधळण करून हात-पाय धुण्यासाठी घराच्या पाठीमागे असलेल्या शेततळ्यावर गेला. याचवेळी आठ वर्षीय सार्थकचा पाय घसरला अन् पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील खाेताचीवाडी येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ही वार्ता समजताच संपूर्ण गावावर शाेककळा पसरली.
खाेताचीवाडी येथील शनी मंदिराच्या पाठीमागे सतीश शिंदे वास्तव्यास आहेत. रंगपंचमी दिनी म्हणजेच बुधवारी ते बाहेर गेले हाेते. पत्नीवर शस्त्रक्रिया झाल्याने त्या घरातच हाेत्या. तर आजी शेतामध्ये गेली हाेती. याचवेळी त्यांचा दुसरीच्या वर्गात शिकणारा आठ वर्षीय मुलगा सार्थक रंग खेळण्यासाठी घराबाहेर पडला. बराच कालावधी लाेटूनही ताे घरी काही परतला नाही. त्याची शाेधाशाेधही केली. परंतु, ताे काही सापडला नाही. यानंतर शिंदे कुटुंबीयांनी घराच्या पाठीमागे खाेदलेल्या शेततळ्याकडे जाऊन पाहिले असता, पाण्यात सार्थकचा मृतदेह आढळून आला. रंग खेळून झाल्यानंतर हात-पाय धुण्यासाठी ताे शेततळ्यावर गेला हाेता. त्याचा पाय घसरला अन् पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, असे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, पाण्यातील मृतदेह बाहेर काढून तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या ठिकाणी उत्तरीय तपासणी झाल्यानंतर शव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सार्थकच्या पश्चात आई, वडील, दाेन बहिणी, भाऊ, आजी, आजाेबा असा परिवार आहे.
मृतदेह पाहून हंबरडा फाेडला...
रंगपंचमीनिमित्त सार्थक सकाळी रंग खेळण्यासाठी गेला हाेता. अन् सायंकाळच्या सुमारास त्याचा शेततळ्यात मृतदेह आढळून आला. हा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फाेडला.
आठ-दहा दिवसांपूर्वीच खाेदले तळे
शेतकरी सतीश शिंदे यांनी आपल्या घराच्या पाठीमागेच शेततळे खाेदले आहे. साधारणपणे आठ ते दहा दिवसांपूर्वीच या तळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणी साेडले हाेते. याच तळ्यात बुडून सार्थकचा दुर्दैवी मृत्यू झाला.
संपूर्ण गाव हळहळले...
आठ वर्षीय सार्थकचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची वार्ता समजताच गावावर शाेककळा पसरली. उत्तरीय तपासणीनंतर शव गावात आणल्यानंतर अख्खं गाव हळहळलं.