अंतगाव ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत; रस्त्यासाठी गावकऱ्यांनी घेतले जमिनीत अर्धे गाडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 19:53 IST2025-05-20T19:52:59+5:302025-05-20T19:53:28+5:30

अर्थसंकल्पीय तरतुदीमधून पाच कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे काम चालू होते. मात्र, या कामास गेल्या वर्षभरापासून निधी नसल्याने ते ठप्प झाले.

End of patience of Antgaon villagers; Villagers take half of the land for the road | अंतगाव ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत; रस्त्यासाठी गावकऱ्यांनी घेतले जमिनीत अर्धे गाडून

अंतगाव ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत; रस्त्यासाठी गावकऱ्यांनी घेतले जमिनीत अर्धे गाडून

भूम (जि. धाराशिव) : तालुक्यातील पाथरुड, वालवड, जवळा ते अंतरगाव या रस्त्याचे काम अर्ध्यातच थांबवण्यात आले आहे. ते तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी अंतरगाव ग्रामस्थांनी सोमवारी रोडवर पाच फूट खड्डा खोदून त्यात कमरेपर्यंत स्वतःला गाडून घेत तीन तास आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

भूम तालुक्यातील पाथरुड, वालवड, जवळा, ईडा, गणेगाव ते अंतरगाव हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीमधून पाच कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे काम चालू होते. मात्र, या कामास गेल्या वर्षभरापासून निधी नसल्याने ते ठप्प झाले. ठेकेदाराने उपलब्ध निधीतून २० टक्केच काम पूर्ण केले आहे. दरम्यान, रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने अंतरगाव व परिसरातील गावच्या नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी नागरिकांनी अनेकदा लेखी व तोंडी पाठपुरावा केला. तरीही काम पुढे सरकत नसल्याने आपल्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी अंतरगाव येथील सरपंच बिरमस माळी, उपसरपंच अनंता खैरे, संतोष गोरे, जयसिंग गोरे, ओंकार गोरे, गणेश लोद व ग्रामस्थांनी स्वत:ला जमिनीत अर्धे गाडून घेत आंदोलन केले. बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर तीन तासांनी हे आंदोलन थांबविण्यात आले.

म्हणून आली गाडून घेण्याची वेळ
हे रस्ता काम अर्धवट असल्याने ग्रामस्थांसह शाळकरी विद्यार्थी, वयस्क नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कामासाठी निधी नसेल तर कामाची सुरुवातच करायची नव्हती. अनेकदा काम सुरू करण्याबाबत कळवूनही बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने जमिनीत गाडून घेण्याची वेळ आली.
- जयसिंग गोरे, ग्रामस्थ, अंतरगाव

निधीसाठी पत्रव्यवहार
निधी उपलब्ध झाला नसल्याने या रस्त्याचे काम थांबविण्यात आले होते. वरिष्ठ कार्यालयाकडे निधीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरच निधी उपलब्ध करून घेत काम पूर्ण करण्यात येईल.
- आर.आर. गिराम, उपअभियंता, भूम

Web Title: End of patience of Antgaon villagers; Villagers take half of the land for the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.