वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या झडल्या, ज्वारीही आडवी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
By चेतनकुमार धनुरे | Updated: March 16, 2023 18:25 IST2023-03-16T18:24:34+5:302023-03-16T18:25:58+5:30
कृषिपंपाचा वीजपुरवठा देखील बंद झाला आहे

वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या झडल्या, ज्वारीही आडवी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
येणेगूर : उमरगा तालुक्यातील येणेगूरसह परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या कैरी झडल्या. तसेच ज्वारीचे उभे पीकही आडवे झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
उमरगा तालुक्यातील येणेगूरसह सुपतगाव, महालिंगरायवाडी, तुगाव आदी गावच्या शिवारात मध्यरात्री अचानक वेगाचे वारे सुटले. सुमारे अर्धा ते पाऊण तास सुटलेल्या या वादळात अष्टा फिडर बंद पडल्याने येणेगूर, सुपतगाव येथील कृषिपंपाचा वीजपुरवठा १० तास बंद पडला होता. गुरुवारी सकाळी ११ वाजता येथील वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला. या वादळात येणेगूर शिवारातील रविराज राजपूत यांच्या गट नं. ५७ मधील २० वर्षांपासून जोपासलेले नारळाचे झाड बुंध्यापासून तुटून जमीनदोस्त झाल्याने आर्थिक नुकसान झाले. शिवाय आंब्याच्या झाडाच्या कच्च्या कैरीही झडून गेल्याने बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला. काढणीस आलेली ज्वारीची काटेरी आडवी पडल्याने शेतकऱ्यांनी काढणीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.