‘प्रभारीराज’मुळे कामकाज ढेपाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:50+5:302021-07-07T04:40:50+5:30
बालाजी आडसूळ कळंब : कोविडच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असो की उपस्थिती संदर्भातील प्रशासकीय निर्देश. यामुळे अगोदरच प्रशासकीय कामकाज ढेपाळले आहे. ...

‘प्रभारीराज’मुळे कामकाज ढेपाळले
बालाजी आडसूळ
कळंब : कोविडच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असो की उपस्थिती संदर्भातील प्रशासकीय निर्देश. यामुळे अगोदरच प्रशासकीय कामकाज ढेपाळले आहे. असे असताना कळंब येथील अनेक शासकीय कार्यालयात नियमित ‘एचओडी’ नसल्याने प्रभारीराज सुरू झाले आहे. कोणाचाच कोणाला पायपोस नसलेल्या या स्थितीत सामान्य नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कळंब शहरात उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय या उपविभागीय आस्थापनासह तहसील, पंचायत समिती, तालुका आरोग्य अधिकारी, लागवड अधिकारी, दुय्यम निबंधक, सहनिबंधक, लेखापरीक्षण, भूमी अभिलेख, गटशिक्षण, एकात्मिक बालविकास प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभाग, जि.प. बांधकाम व लघू पाटबंधारे विभाग, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे, तालुका लघू पशुचिकित्सालय, जलसंधारण, जलसंपदा, पाटबंधारे उपविभाग, महावितरण, दूरसंचार अशी विविध शासकीय तालुका स्तरावरील कार्यालय कार्यान्वित आहेत. याशिवाय ईटकूर, कळंब, मोहा, येरमाळा, शिराढोण, गोविंदपूर येथे महसूल मंडळ कार्यालय, ३५ गावांत तलाठी कार्यालय, ९१ गावांत ग्रामपंचायत कार्यालय, कळंब, येरमळा व शिराढोण येथे मंडळ कृषी कार्यालय, शिराढोण व येरमाळा येथे पोलिस ठाणे कार्यान्वित आहे. येरमाळा, मोहा, गोविंदपूर, शिराढोण, ईटकूर, दहिफळ व कळंब येथे महावितरणचे शाखा कार्यालय तर मोहा, ईटकूर, मंगरूळ, दहिफळ, येरमाळा, शिराढोण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच इतर २८ ठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहेत.
एकूणच उपरोक्त सर्व कार्यालये तालुक्यातील जवळपास दोन लाखांवर लोकसंख्येच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी, जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. या प्रत्येक कार्यालयात ‘खातेप्रमुख’ म्हणून एक तालुका स्तरावरील अधिकारी असतो. त्यांच्या नियोजन अन् नियंत्रणाखाली इतर क्षेत्रीय, आस्थापना विभागाचे कर्मचारी आपापला ‘जॉबचार्ट’ पार पाडतात. मात्र, मागच्या दीड वर्षापासून कळंब तालुक्यातील प्रशासकीय घडी विस्कटलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेले लॉकडाऊन, त्यानंतर कार्यालयात उपस्थिती दर्शविण्यासाठी दिलेली मुभा, हे कमी होते की काय, म्हणून तालुक्यातील बहुतांश प्रमुख विभागाच्या ‘एचओडी’च्या पोस्टही रिक्त आहेत. यामुळे त्या-त्या विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
चौकट...
या कार्यालयांची पदे रिक्त
कळंब येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार भूम येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आहे. याशिवाय मोठ्या लांबीचा रस्ता विकास करत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंतापदाचा भार वाशीचे ‘डेप्युटी’ सांभाळत आहेत. जि.प. बांधकाम उपविभागाचा कारभारही सध्या ‘प्रभारी’ असून, जलसंधारण विभागाचे उपविभागीय कार्यालय तर दिवसभर ‘निर्मनुष्य’ असते. दुय्यम निबंधक, सहायक निबंधक (सहकारी संस्था), गट शिक्षणाधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख, दूरसंचार, नायब तहसीलदार, महावितरणचे काही कनिष्ठ अभियंता कार्यालये, सहायक गटविकास अधिकारी अशी कळंब येथील रिक्त असलेल्या पदाची मोठी ‘जंत्री’ असून, याकडे त्या-त्या विभागाचे ‘मंत्री’ लक्ष देतील का, असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.
कोणाचा पायपोस कोणाला नाही...
येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील एका नियमित, परंतु भलतेच ‘कर्तव्यदक्ष’ असलेल्या साहेबांची बदली झाल्यापासून प्रभारीराज चालू आहे. या ठिकाणी आजवर हे प्रभारीही कायम राहिले नसून, दर महिना-पंधरा दिवसाला नवाच चेहरा खुर्चीवर बसलेला असतो. दोनशेक शाळा व पंचवीसेक हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य असलेल्या गटशिक्षण कार्यालयातही सध्या ‘संगीत खुर्ची’चा डाव रंगणार आहे. सर्वात कहर म्हणजे जलसंधारण व भूमी अभिलेख कार्यालयात तर कोण कार्यरत आहे अन् कोणाला भेटावे, अशीच सध्या स्थिती आहे. महावितरण कार्यालयात त्यांच्याच हिताच्या असलेल्या ‘डिमांड’ काढण्याच्या कामासाठी महिनोंमहिने हेलपाटे मारावे लागत आहेत. एकूणच तालुक्यातील ‘एचओडी’ नसलेल्या विविध कार्यालयात सध्या कोणाचा पायपोस कोणाला नसल्याचे दिसून येत आहे.
नायब तहसीलदार; चार पदे रिक्त...
कळंब तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांची पाच पदे मंजूर आहेत. यापैकी निवासी नायब तहसीलदार, संगायो विभाग, पुरवठा विभाग या जागा रिक्त आहेत. केवळ महसूल व निवडणूक या दोन जागी नायब तहसीलदार कार्यरत आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार पदही रिक्तच आहे.