कंत्राटदारांमुळे जिल्ह्यातील महामार्गांच्या काेट्यवधीच्या कामांना काेलदांडा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST2021-08-26T04:34:33+5:302021-08-26T04:34:33+5:30
उस्मानाबाद -दळणवळणाची सुविधा अधिक गतिमान व्हावी, यासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख मार्गांसाठी काेट्यवधीचा निधी मंजूर करण्यात आला. कामेही सुरू झाली. ...

कंत्राटदारांमुळे जिल्ह्यातील महामार्गांच्या काेट्यवधीच्या कामांना काेलदांडा...
उस्मानाबाद -दळणवळणाची सुविधा अधिक गतिमान व्हावी, यासाठी जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख मार्गांसाठी काेट्यवधीचा निधी मंजूर करण्यात आला. कामेही सुरू झाली. परंतु, ही कामे अपेक्षित गतीने करण्यात आली नाहीत. परिणामी आठ-आठ वर्षांचा कालावधी लाेटूनही साेलापूर-हैदराबाद सारख्या महत्वपूर्ण महामार्गाचे काम रखडले आहे. हे काम सुरू नसतानाही टाेल वसुली मात्र जाेरात सुरू आहे. खामगाव-पंढरपूर या रस्त्याचे काम सुरू हाेऊन चार वर्षांचा कालावधी लाेटला. मात्र, आजही ३० पैकी ६ किमीचे काम ठप्प आहे. या दाेन्ही मार्गांवर वाहनांची माेठी वर्दळ असते. त्यामुळे वाहनधारकांना सातत्याने वाहतूक काेंडीचा सामना करावा लागताे. एवढेच नाही, तर लहान-माेठ्या अपघाती घटनांचे प्रमाणही वाढले आहे. उपराेक्त चित्र लक्षात घेता, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यानी रस्त्यांची कामे गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
चाैकट...
खामगाव-पंढरपूर
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या खामगाव-पंढरपूर या सुमारे ४५० किमी अंतराच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. यातील कुसळंब ते केज असा ६० किमीचा एक स्वतंत्र पॅकेज असून त्यासाठी साडेचारशे कोटी रुपये मंजूर आहेत. या पॅकेजमधील ३० किमी अंतराचे काम उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. तब्बल चार वर्षानंतर यापैकी २४ किमीचे काम पूर्ण करण्यात आले असून, ६ किमीचे काम ठप्प झाले आहे. कंत्राटदाराने दुसरे माेठे काम हाती घेतल्याने सर्व यंत्रणा त्या कामावर शिफ्ट केली. त्यामुळे हे काम रखडले आहे.
हैदराबाद-साेलापूर
शंभर किलोमीटर अंतराच्या चौपदरीकरणासाठी जवळपास शेकडो हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या चौपदरीकरणाचे अद्याप पूर्ण झालेले नाही. सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून अनेक ठिकाणी उपाययाेजना केलेल्या नसतानाही ठेकेदार कंपनीने ८० टक्के चाैपदरीकरण झाल्याचे दाखवून टाेल वसुलीस परवानगी मिळविली. दीड वर्षांपासून इटकळ व तलमाेड अशा दाेन टाेलनाक्यांवरून टाेल वसुली सुरू आहे. उर्वरित चाैपदरीकरणाचे काम मात्र बंद आहे. एवढेच नाही तर एकाही उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण करण्यासाठी केवळ दाेन वर्षांची मुदत हाेती, हे विशेष.
राजकारणी काय म्हणतात..?
आठ वर्षांपासून काम सुरूच आहे. चाैपदरीकरणाचे काम अर्धवट आहे. उड्डाणपुलाची कामे झालेली नाहीत. जे काम झाले आहे, तेही दर्जाहीन आहे. तरीही टाेलवसुली सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने वेळाेवेळी आवाज उठविला आहे. यापुढेही पाठपुरावा करू.
-प्रा. सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस.
जिल्ह्यातील साेलापूर-हैदराबाद तसेच पंढरपूर मार्गांचे काम रखडले आहे. त्यास काेणत्याही पक्षाचे पदाधिकारी जबाबदार नाहीत. ठेकेदारांची भूमिकाही कामे रखडण्यास जबाबदार आहे. रखडलेल्या कामांना गती मिळावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करू.
-ॲड. धीरज पाटील, जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस.