दारू पिऊन आलेल्या मुलाचा मारहाणीत मृत्यू; पित्यावर झाली खुनाच्या गुन्ह्याची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 19:07 IST2025-05-08T19:06:53+5:302025-05-08T19:07:00+5:30
तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यातही घेतले आहे.

दारू पिऊन आलेल्या मुलाचा मारहाणीत मृत्यू; पित्यावर झाली खुनाच्या गुन्ह्याची नोंद
तामलवाडी (जि. धाराशिव) : तुळजापूर तालुक्यातील दहीवडी येथील एका पित्याने मुलास दारू पिऊन का आलास, अशी विचारणा करीत लाकडाने जबर मारहाण केली. यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोजी सकाळी ९:३० वाजता घडली. दरम्यान, तामलवाडी पोलिसांच्या चौकशीतून खून निष्पन्न झाल्याने बुधवारी आरोपी पित्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दहिवडी येथील समाधान बिभीषण चव्हाण (२६) हा ४ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन घराकडे आला होता. त्याचे वडील बिभीषण चव्हाण यांनी दारू पिल्याचा जाब विचारल्याने दोघांत भांडण जुंपले. यानंतर बिभीषण चव्हाण यांनी मुलगा समाधान यास लाकडाने जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या समाधानचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तामलवाडी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. मात्र, वैद्यकीय अहवाल तसेच अधिक चौकशीत मारहाणीने मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पिता बिभीषण चव्हाणवर कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तामलवाडी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोपाळ ठाकूर हे करीत आहेत.
चुलत्याची फिर्याद, आरोपी अटकेत
पोलिसांच्या चौकशीत समाधानचा मृत्यू मारहाणीने झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मयताचे चुलते तथा आरोपीचे भाऊ विश्वास शेषाद्री चव्हाण यांनी तामलवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी बिभीषण चव्हाणवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे.