तुळजाभवानी संस्थानच्या कार्यालयात मद्यपी पुजाऱ्याचा गोंधळ; तहसीलदारांना शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:40 IST2025-05-15T13:38:42+5:302025-05-15T13:40:11+5:30
पूजाऱ्याने कार्यालयीन कामकाज सुरू असताना अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मंदिर संस्थान आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक यांच्याशी अर्वाच्य भाषेत हुज्जत घातली

तुळजाभवानी संस्थानच्या कार्यालयात मद्यपी पुजाऱ्याचा गोंधळ; तहसीलदारांना शिवीगाळ
तुळजापूर (जि. धाराशिव) : मंदिर संस्थानकडून देऊळ कवायत कायद्यानुसार कारणे दाखवा नोटीस दिल्याने पुजारी अनुप कदम यांनी मद्यपान करून तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात जाऊन तहसीलदार तथा व्यवस्थापकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून गोंधळ घातला तसेच तोडफोड केली. या प्रकरणी पुजाऱ्याविरुद्ध तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंद झाला आहे.
मंदिर संस्थानकडून नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षक पुरवठादार कंपनीने मंदिर संस्थानला नुकताच अहवाल दिला हाेता. त्यानुसार अनुप कदम यांनी १३ एप्रिल रोजी मंदिराच्या व्हीआयपी गेटवर सुरक्षा रक्षकांसोबत धक्काबुक्की व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केला. यानंतर १५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्या दालनात कार्यालयीन कामकाज सुरू असताना अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मंदिर संस्थान आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक यांच्याशी अर्वाच्य भाषेत हुज्जत घातली असता, कारवाईचा इशारा दिला हाेता. यानंतरही ते तिथेच बसून राहिले.
दुसऱ्या अहवालानुसार १५ एप्रिल रोजी अनुप कदम यांनी श्री तुळजाभवानी संस्थान कार्यालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या दरवाजास लाथ घालून दरवाजा उघडल्याची घटना घडली. या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय काेणालाही प्रवेश देता येत नाही. दरम्यान, उपराेक्त दाेन्ही घटनांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर देऊळ कवायत कायद्यान्वये नाेटीस देत आपणाविरुद्ध ३ महिन्यांसाठी मंदिर प्रवेश बंदी का केली जावू नये, अशी विचारणा केली हाेती. याच रागातून अनुप कदम यांनी १३ मे राेजी मंदिर संस्थानच्या कार्यालयात जावून तहसीलदार यांना अर्वाच्च भाषेत शिव्या देत गोंधळ घातला. तसेच मंदिर संस्थान कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची काचही हाताने फोडली. या घटनेनंतर मंदिर संस्थानने तुळजापूर पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.