२०९ नागरिकांच्या शंकांचे झाले निरसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST2021-08-26T04:34:17+5:302021-08-26T04:34:17+5:30
उमरगा : पुरवठा विभागाच्या वतीने ‘माझी शिधापत्रिका, माझा हक्क’ हे अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत उमरगा येथे मंगळवारी ...

२०९ नागरिकांच्या शंकांचे झाले निरसन
उमरगा : पुरवठा विभागाच्या वतीने ‘माझी शिधापत्रिका, माझा हक्क’ हे अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत उमरगा येथे मंगळवारी घेण्यात आलेल्या शिबिरात २०९ शिधापत्रिकाधारकांच्या विविध समस्यांचे निरसन करून सेतू किंवा महा ई-सेवा केंद्रात रितसर कागदपत्रे दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले.
उमरगा मंडलांतर्गत येणाऱ्या सजाअंतर्गत गावातील लाभार्थींसाठी हे शिबिर घेण्यात आले. यावेळी रेशन कार्डातील नावे वाढविणे, कमी करणे, नावात दुरुस्त करणे आदी अडचणींची सोडवणूक करण्यात आली. शिधापत्रिकेतील विविध दुरुस्तींबाबत विहित नमुन्यातील अर्ज, स्वयंघोषणापत्र, मूळ शिधापत्रिका, आधार कार्डाची छायांकितप्रत ही मुख्य कागदपत्रे लागणार असून, नाव समाविष्ट करण्यासाठी नाव कमी केल्याबाबतचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र, नाव कमी करण्यासाठी रास्त भाव दुकानदार यांचे प्रमाणपत्र, नाव दुरुस्तीसाठी ज्या शिधापत्रिकेतील नाव दुरुस्ती करावयाची आहे ती मूळ शिधापत्रिका, जीर्ण शिधापत्रिका बदलून देण्यासाठी रास्त भाव दुकानदार यांचे युनिट प्रमाणपत्र, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य प्रमाणपत्रासाठी रास्त भाव दुकानदार यांचे युनिट प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते. याबाबत लाभार्थींनी ऑनलाइन प्रस्ताव दाखल केल्यानंतर मूळ अर्ज तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत स्वीकारले जाणार असल्याची माहिती, नायब तहसीलदार थोटे व अव्वल कारकून के. बी. बनसोडे यांनी यावेळी दिली.