डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे केवळ ६५० ग्रॅम वजन असलेल्या चिमुकलीस मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 06:35 PM2018-09-12T18:35:06+5:302018-09-12T18:37:44+5:30

इतक्या कमी वयाच्या अर्भकाला वाचविण्यात यश येणारी जिल्ह्यातील ही पहिली घटना ठरली आहे़.

Doctor's efforts Gives Life to only 650 grams Weighed baby | डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे केवळ ६५० ग्रॅम वजन असलेल्या चिमुकलीस मिळाले जीवदान

डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे केवळ ६५० ग्रॅम वजन असलेल्या चिमुकलीस मिळाले जीवदान

googlenewsNext

उस्मानाबाद : जन्मत: वजन ६५० ग्रॅम, श्वास घेतानाही होणारा त्रास, अशा स्थितीतील एका चिमुकलीस जीवदान देण्यात येथील महिला रूग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे़ अडीच महिन्यानंतर बालिकेला डिस्चार्ज देण्यात आला आहे़ विशेषत: इतक्या कमी वयाच्या अर्भकाला वाचविण्यात यश येणारी जिल्ह्यातील ही पहिली घटना ठरली आहे़.

उस्मानाबाद येथील ६० खाटाच्या जिल्हा रूग्णालयात प्रसुती होणाऱ्या गरोदर महिलांची संख्या १५० च्या वर असते़ मंजूर पदानुसार वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदेही रिक्त आहेत़ अपुऱ्या खाटांमुळे जमिनीवर गाद्या टाकून महिलांवर उपचार केले जातात़ अशा परिस्थितीत या रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जन्म: ६५० ग्रॅम वजन असलेल्या बालिकेला जीवदान मिळाले आहे़ शहरातील उंबरे कोठा भागात राहणारे रवींद्र झोंबाडे यांच्या पत्नी शितल यांची शहरातील खासगी रूग्णालयात ४ जुलै रोजी प्रसुती झाली होती़ त्यांना जुळ्या मुली झाल्या होत्या.

मात्र, वजन कमी असल्याने एका अर्भकाचा जन्म: मृत्यू झाला़ दुसऱ्या मुलीला उपचारासाठी महिला रूग्णालयातील ‘एसएनसीयू’  मध्ये (बालकांचे अतिदक्षता विभाग) ठेवण्यात आले होते़ ६५० ग्रॅम वजनाच्या अर्भकाला वाचविण्याचे मोठे आव्हान येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर होते़ त्या बालिकेला अनेकवेळा श्वास घेताना अडचणी येत होत्या़ शिवाय अन्नही पचन होत नव्हते़ बालिकेला वाचविण्यासाठी आणि सुदृढ बनविण्यासाठी महिला रूग्णालयातील अधीक्षक डॉ़ आऱपी़वाघमारे, बालरोग तज्ज्ञ डॉ़ मुकुंद माने  यांनी कांगारू पध्दतीचा अवलंब करून उपचार सुरू केले़ बाळाचे शरीर थंड पडू नये म्हणून आईने तिला शरिराची उब दिली़ महिला रूग्णालयातील टीम व बालिकेच्या माता-पित्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज त्या बालिकेचे वजन १३०० ग्रॅमवर गेले असून, तिला डिश्चार्ज देण्यात आला आहे़

प्रयत्नांना यश
यापूर्वी महिला रूग्णालयात ९०० ग्रॅम वजनाच्या अर्भकावर यशस्वी उपचार करण्यात आले होते़ मात्र, झोेंबाडे यांच्या ६५० ग्रॅम वजनाच्या स्त्री अर्भकावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत़ आम्ही एकत्रित केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे समाधान असल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ़ मुकुंद माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

‘तिच्या’ जिवासाठी मातापित्याची धावपळ
रवींद्र झोंबाडे हे फळांची विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात़ त्यांना यापूर्वीच्या तीन मुली आहेत़ चौथीही मुलगी झाली़ मात्र, तिचे वजन कमी होते़ मात्र, झोंबाडे दाम्पत्यांनी या मुलीचे प्राण वाचावेत, यासाठी मोठी धावपळ केली़ यापुढेही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मुलीची काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले़.

Web Title: Doctor's efforts Gives Life to only 650 grams Weighed baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.