कळंब : पीकपद्धती बदलत आहे, दोन्ही प्रमुख हंगामाखालील क्षेत्र, फळपिके व भाजीपाला वाढत आहे. अशी स्थिती सुखद असली तरी ही शेती कसण्यासाठी गरजेच्या असणाऱ्या मजुरांची मात्र मोठी वानवा आहे. यामुळे गावोगावी मजूर आणायचे कोठून, असा शेती क्षेत्रासमोर सवाल उभा ठाकला आहे.
काळाच्या ओघात ग्रामीण भागात अनेक ‘स्थित्यंतरे’ झाली आहेत. यात बहुतांश मजूरवर्गांना शेतीव्यतिरिक्त ‘रोजगार’ मिळत आहे. यातून काही गावांत ‘स्थलांतरे’ही नोंदली गेली आहेत. यामुळे निव्वळ शेती मशागतीवर उदरनिर्वाह भागविणाऱ्या कुटुंबातील संख्या गरजेच्या तुलनेत अत्यल्प राहिली आहे. यास्थितीत शेती क्षेत्र कात टाकत असताना पीकपद्धती बदलत असली तरी संकटाची मालिका काही संपुष्टात आलेली नाही. लहरी निसर्ग, वाढता उत्पादन खर्च, दरातील अस्थिरता, यासोबतच शेती कसण्यासाठी मजुरांची कमतरता जाणवत असल्याने गावोगावी कोणी मजूर देता का मजूर, अशी विनवणी करण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
शेती कामासाठी मजूर मिळतच नाहीत. यामुळे बळीराजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कापूस वेचणीसाठी माणसे मिळत नाहीत, यात वेचणीचा दरही वाढविला आहे. यामुळे यापुढे पीकच घ्यायचे टाळणार आहोत.
- राजाभाऊ गंभिरे
मजुरांअभावी फवारणी, भाजीपाला काढणी, खुरपणी, खते देणे आदी कामे वेळेवर न झाल्याने उत्पादनात घट होते आणि सध्या मजूर गुत्ते पद्धतीमध्ये अवाच्या सव्वा मागत आहे; परंतु पर्याय नाही. उदाहरणार्थ ऊस लावणं 6000 रुपये एकर, सोयाबीन काढणी 4000 रुपये बॅग घेत आहेत.
- विनोद तांबारे, आंदोरा
शेतीच्या दैनंदिन कामासाठी मजूर मिळत नाहीत. याशिवाय नियमित कामासाठी सालगडीही मिळत नाहीत. यासाठी इतर जिल्ह्यात भटकंती करावी लागते. सोयाबीन काढणीला बाहेरच्या जिल्ह्यातील मजूर आणले होते.
-तानाजी वाघमारे, भाटशिरपुरा
गरज ही शोधाची जननी
मजुरांची उपलब्धता होत नसल्याने नवतंत्राने अनेक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली आहे. ट्रॅक्टर्सचा व त्यावरील यांत्रिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळेच बैलपेरा आता नामशेष होत आहे, तर कापूस वेचणीसाठी यंत्राचा शोध लागत नसल्याने व मजूरही मिळत नसल्याने शेतकरी हे पीक घेण्याचे टाळत आहेत.
यंत्राने होणारी कामे
नांगरणी, मोगडणी, पाळी, पेरणी, काढणी, फवारणी अशी कामे यंत्राने होत आहेत. मात्र, मशागत, काढणी, छाटणी, मळणी आदी विविध पिकांच्या कामाला मजुरांची गरज असते.