(फोटो : बालाजी आडसूळ १९)
कळंब : रॅपिड अँटिजेन टेस्टमुळे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल तत्काळ मिळतो. आरटीपीसीआर चाचणीनंतर अहवालासाठी २४ तास वाट पाहावी लागते. यामुळे कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट घेणे सुरू आहे. याच्या अहवालाबाबत कसलीही शंका न घेता व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.
कळंब शहरात १८ मार्च रोजी सराफा लाईनमधील मन्मथ स्वामी मंदिरात - रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या. यात ४२ जण पॉझिटिव्ह, तर तालुक्यात ५९ जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाल्यानंतर प्रशासन गतिमान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी लसीकरण केंद्राला भेट देऊन रॅपिड अँटिजेन टेस्ट व आरटीपीसीआर स्वॅब घेतले जात आहेत की नाही, याविषयी माहिती घेतली. यानंतर शुक्रवारी त्यांनी कळंब उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी काही नागरिक रॅपिड अँटिजेन टेस्टच्या खरेपणाबद्दल शंका व्यक्त करीत आहेत, असे सांगितले. यावर जिल्हाधिकारी यांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह असल्यास यात शंका घेण्याचे कारण नाही. अहवाल निगेटिव्ह असेल तर यावर चर्चा केलेली बरी, असे सांगितले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, अधिकारी डॉ. शोभा वायदंडे, डॉ. पुरुषोत्तम पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
चौकट
शिष्टमंडळाशी केली चर्चा
यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कोविड सेंटरला भेट देत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच कोरोना बाधितांचा रहिवास असलेल्या घर व भागात करण्यात येत असलेल्या कटेन्मेंट झोन भागाची पाहणी केली. यानंतर उपविभागीय कार्यालयात शहरातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. अधिकाऱ्यांसमवेत संवाद साधत काही सूचना केल्या. यावेळी तहसीलदार रोहन शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीपकुमार जाधव, नायब तहसीलदार अस्लम जमादार, परवीन पठाण आदी उपस्थित होते.