औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा; 'धाराशिव' नावासाठी मनसे मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 19:32 IST2021-01-04T19:25:42+5:302021-01-04T19:32:01+5:30
MNS on field for the name 'Dharashiv' for Usmanabad मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भावना मांडल्या.

औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराची चर्चा; 'धाराशिव' नावासाठी मनसे मैदानात
उस्मानाबाद : उस्मानाबाद शहराच्या नामांतरावर बसलेली धूळ यावेळी मनसेने उडविली आहे. सोमवारी त्यांनी या संदर्भात निवेदन देऊन तातडीने ही नामांतर प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम, दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या भावना मांडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारला व सरकार स्थापन केले. मग त्यांनी बाळासाहेबांचे नामांतर विषयीचे स्वप्न पूर्ण केलेच पाहिजे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे संभाजीनगर, तर उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर व्हावे, असे १९८८ साली जाहीर केले होते. त्यांचे हे स्वप्न होते, त्यांची ती भावना होती. मग ज्या स्वप्नासाठी सरकार स्थापन झाले, ते त्यांनी पूर्ण केलेच पाहिजे, असा आग्रह मनसेने धरला आहे.
उस्मानाबाद हे नाव शेवटचा निजाम राजा मीर उस्मान अली याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. राज्यात शिवसेना सरकारमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने नामांतर करावे, अशी मागणीही मनसेने केली आहे. यावेळी उस्मानाबाद शहराध्यक्ष संजय पवार, तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल महाजन, उमेश कांबळे, सौरभ देशमुख, अक्षय सावळे, वेदकुमार पेंदे, रामभाऊ मोटे, नितेश कोकाटे व पदाधिकारी उपस्थित होते.
१९९५ साली प्रक्रिया
१९०५ साली नळदुर्गहून जिल्हा मुख्यालय धाराशिवला हलविल्यानंतर हे नामकरण झाले आहे. त्यामुळे आता बदल करणे आवश्यक आहे, असे मनसेने नमूद केले आहे. दरम्यान, १९९५ साली युतीचे सरकार आल्यानंतर काही काळ याची प्रक्रियाही सुरू झाली होती. मात्र, नंतर ती थांबली. ती स्थिती अद्यापपर्यंत कायम आहे.