नवरदेवाचा नादच खुळा! आधी बजावलं मतदानाचं कर्तव्य, मगच चढला लग्नाच्या बोहल्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 13:20 IST2026-02-07T13:19:56+5:302026-02-07T13:20:19+5:30
वरात निघण्यापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क; जिल्हा परिषद निवडणुकीचा अनोखा उत्साह.

नवरदेवाचा नादच खुळा! आधी बजावलं मतदानाचं कर्तव्य, मगच चढला लग्नाच्या बोहल्यावर
- बालाजी बिराजदार
लोहारा (जि. धाराशिव): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत अनेकजण मतदानाचा हक्क बजावण्यास टाळाटाळ करत असताना, हिप्परगा (रवा) येथील एका नवरदेवाने मात्र अनोखी निष्ठा दाखवली आहे. सिद्धेश्वर दत्ता वाडकर असे या नवरदेवाचे नाव असून, आज त्यांचा विवाह असतानाही त्यांनी मांडवात जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावला.
हळदीच्या अंगाने गाठले केंद्र
सिद्धेश्वर यांचा विवाह आज नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथे पार पडणार होता. घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची ये-जा आणि वरात निघण्याची वेळ असतानाही सिद्धेश्वर यांनी ठाम भूमिका घेतली की, "मी आधी मतदान करणार आणि मगच लग्नासाठी निघणार." त्यानुसार, नवरदेवाच्या वेशातच त्यांनी हिप्परगा येथील मतदान केंद्र गाठले. त्यांच्या या कृतीने उपस्थित कर्मचारी आणि ग्रामस्थ भारावून गेले.
समाजासाठी मोठे उदाहरण
मतदान केल्यानंतर सिद्धेश्वर लग्नाच्या सोहळ्यासाठी रवाना झाले. याप्रकरणी हिप्परगा (रवा) चे पोलीस पाटील संजय नरगाळे यांनी त्यांचे कौतुक करताना म्हटले की, "लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवशीही मतदानाला सर्वोच्च प्राधान्य देणारे सिद्धेश्वर यांचे कृत्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. कोणतेही कारण पुढे न करता प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, हेच यातून अधोरेखित होते." एकीकडे सुटीचा आनंद मानून घरी बसणाऱ्या मतदारांना या नवरदेवाने आपल्या कृतीतून चपराक लगावली असून, 'लोकशाही हीच आमची खरी ताकद' असल्याचे सिद्ध केले आहे.